सदस्याने चिठ्ठी खाऊन मतदानच गायब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

चिपळूण - तालुक्‍यातील कामथे येथील उपसरपंचपदाच्या निवडणुकीत ९ सदस्यांनी मतदान केले होते. मतमोजणीवेळी प्रत्यक्षात आठ चिठ्ठ्याच मिळाल्या. गायब झालेली चिठ्ठी ही एका सदस्यानेच खाऊन गायब केली, असा गंभीर आरोप गाव विकास पॅनेलने केला आहे. ‘मतदान झालेली चिठ्ठी गायब झाल्याने उपसरपंचपदाची फेरनिवडणूक घ्यावी’, अशी मागणी गाव विकास पॅनेलने अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

चिपळूण - तालुक्‍यातील कामथे येथील उपसरपंचपदाच्या निवडणुकीत ९ सदस्यांनी मतदान केले होते. मतमोजणीवेळी प्रत्यक्षात आठ चिठ्ठ्याच मिळाल्या. गायब झालेली चिठ्ठी ही एका सदस्यानेच खाऊन गायब केली, असा गंभीर आरोप गाव विकास पॅनेलने केला आहे. ‘मतदान झालेली चिठ्ठी गायब झाल्याने उपसरपंचपदाची फेरनिवडणूक घ्यावी’, अशी मागणी गाव विकास पॅनेलने अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

निवडणूक विभागाकडून संपूर्ण मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले आहे. यामध्ये मतदान करतेवेळी सदस्यांच्या हालचाली टिपण्यात आल्या आहेत. एका सदस्याने चिठ्ठी खाल्ल्याने ती मतमोजणीत मिळाली नाही. मतदान करतेवेळी सर्व सदस्यांनी घेतलेला वेळ व हालचालींमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याच्या हालचाली संशयास्पद आहेत. त्यामुळे त्या सदस्याने मतदान करते वेळी आपल्याच मताची चिठ्ठी खाल्ली असावी, असा आरोप करीत उपसरपंचपदाची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी गावविकास पॅनेलतर्फे हरी कासार यांनी केली आहे. 

तालुक्‍यातील कामथेची निवडणूक आर्थिक उलाढालीमुळे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेची बनली होती. आता उपसरपंचपदाच्या निवडणुकीत एक मत गायब झाल्याने पुन्हा एकदा कामथे चर्चेत आले आहे. येथील निवडणुकीत सुकाई पॅनेलने ९ पैकी ५ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. थेट सरपंच म्हणून सुकाई पॅनेलचे विजय माटे विजयी झाले. गाव विकास पॅनेलला ४ जागा मिळाल्या. उपसरपंच निवडीपूर्वी सुकाई पॅनेलचा एक सदस्य गाव विकास पॅनेलला मिळाला. त्यामुळे उपसरपंचपदाच्या निवडीत गाव विकास पॅनेलचे पारडे जड होते. आपल्या गोटातील ग्रामपंचायत सदस्यांना दगाफटका होऊ नये म्हणून गाव विकास पॅनेलने त्यांना अज्ञातस्थळी हलविले होते.

उपसरपंचपदाच्या निवडीसाठी रविवारी (ता. १२) कामथे येथे निवडणूक झाली. सुकाई पॅनेलतर्फे प्रदीप उदेक आणि गाव विकास आघाडीकडून सौ. अक्षता कासार यांनी अर्ज दाखल केल्यावर निवडणुकीदरम्यान कोणताही गोंधळ आणि वादविवाद नको म्हणून प्रत्यक्ष मतदानाने उपसरपंच निवड करण्याचे ठरले. नऊ सदस्यांनी मतदान केले. मोजणीसाठी आठच चिठ्ठ्या मिळाल्या. त्यामुळे एक मत कोठे गेले, याबाबत गोंधळ सुरू झाला. कोणत्या तरी सदस्याने मतदानाच्या वेळी मतपेटीत मत टाकलेच नसावे. एखाद्याने स्वत:चेच मत खाल्ले की काय, अशी खुमासदार चर्चाही रंगली होती. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

 

Web Title: Ratnagiri News Kamathe sarpanch election issue