राष्ट्रवादीशी छुपी आघाडी करूनही भाजप गोत्यात

सिद्धेश परशेट्ये
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या साथीने अनेक गावात छुपी आघाडी करून सेनेला चितपट करण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पानिपतच झाले. त्यामुळे यापुढे भाजपची तालुक्‍यातील वाटचाल खडतरच राहणार आहे.

खेड - खेड तालुक्‍यात भाजप उभारी घेण्याचा प्रयत्न करीत होता. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक काळात सेनेतून काही कारभारी भाजपमध्ये दाखल झाले, तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व पाठोपाठ ग्रामपंचायतीत कोणतीही किमया साधलेली नाही.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या साथीने अनेक गावात छुपी आघाडी करून सेनेला चितपट करण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पानिपतच झाले. त्यामुळे यापुढे भाजपची तालुक्‍यातील वाटचाल खडतरच राहणार आहे.

सध्या असलेले कार्यकर्ते तरी कायम राहतील की नाही, हीच शंका आहे. सेनेतून आलेल्या त्या कारभाऱ्यांनी येताना काही कार्यकर्ते आणले; परंतु आलेल्या कार्यकर्त्यांना भाजप सत्तेतील पक्ष आहे, केंद्रातील व राज्यातील सत्तेचा आपल्याला विकासकामांसाठी उपयोग करून घेता येईल, खऱ्या अर्थांने आपल्याला सद्यस्थितीत उभारी घेण्यासाठी मदत होईल, तालुक्‍यात पक्षवाढीसह पाया भक्कम करू, अशी पोकळ आश्‍वासने देण्यात आली. त्या आश्‍वासनांना भुलून कारभाऱ्यासोबत सेनेतून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये आले. भाजपमध्ये पदे तर नाहीच, पण पक्ष बदलल्यामुळे गावातील प्रतिष्ठाही पुन्हा मिळवावी लागत आहे. परिणामी कारभाऱ्यांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. वरिष्ठ पातळीवरील नेते तालुक्‍यात येत होते.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून विविध 
कार्यक्रमदेखील हाती घेण्यात आले होते. भाजपाचे अनेक राज्यस्तरीय नेते प्रचाराला येत होते. त्यामुळे तालुक्‍यात एक वेगळा माहोल होता; परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपाठोपाठ ग्रामपंचायतीत भाजपचा फुगा फुटला. त्यामुळे भाजपला मरगळ आली. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या या कारभाऱ्यांनी घड्याळ मनगटावर बांधून ग्रामीण भागातील सेनेचा वारू रोखण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघांना अपयश आले. आता सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यापलीकडे या कारभाऱ्याकडे कोणताही कार्यक्रम दिसत नाही.

 

Web Title: Ratnagiri news Khad Taluka politics