खारभूमी बंधाऱ्याची झडपे बसविण्यास सुरवात
पावस - रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे खारभूमी बंधाऱ्याच्या तुटलेल्या झडपांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. यासाठी निधीही मंजूर होता. मात्र काम रखडले होते.
पावस - रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे खारभूमी बंधाऱ्याच्या तुटलेल्या झडपांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. यासाठी निधीही मंजूर होता. मात्र काम रखडले होते.
याबाबत सचित्र वृत्त सोमवारी (ता. १६) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आज येथील झडपे बसविण्यात प्रारंभ केला आहे.
या खारभूमी बंधाऱ्याच्या तुटलेल्या झडपांकरिता सन २०१५ पासून पाठपुरावा सुरू होता. या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी सातत्याने केलेला पाठपुराव्यामुळे या गोष्टीची दखल घेत भाजपाचे बंदरविकास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाच लाखाचा निधी २६ झडपांकरिता मंजूर करून त्याला प्रशासकीय मंजुरी दिली होती. परंतु झडपे केव्हा बसणार हा प्रश्न ऐरणीवर होता. याचे सचित्र वृत्त आज ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल खारभूमी विभागाने घेतली.
आज सकाळी खारभूमी विकास उपविभागाच्या सहाय्यक अभियंता सौ. स्नेहल माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सडलेल्या झडपा व त्यांच्या रिंगा गंजलेल्या होत्या. त्या बदलण्यास सुरवात झाली. आज पहिल्या टप्प्यात दहा झडपे बसविण्यात आली. भरती-ओहोटीचा विचार करून हे काम सुरू आहे. बंधाऱ्याच्या तुटलेल्या झडपांमुळे गावडेआंबेरे, मावळंगे, नातूंडे, जांभूळआड आदी परिसरातील शेकडो ऐकर जमिन नापिक बनून विहिरी खाऱ्या झाल्या होत्या.
झडपे बसविण्यास सुरवात झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. याबाबत गावडेआंबेरे येथील शेतकरी योगेश केळकर म्हणाले की, १९९६-९७ च्या दरम्यान गावडेआंबेरेचे सरपंच बाळू केळकर यांनी खारभूमी बंधारा होण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्याला यश आले. मात्र तुटलेल्या झडपा बसविण्यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तो सुदिन उजाडला आणि कामाला सुरवात झाली. त्यामुळे परिसरातील जमिनी सुपिक बनतील.