'''हत्ती हटाव'चा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा''

Representational image
Representational image

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात वाढलेला हत्तींचा उपद्रव कमी व्हावा, शेतकऱ्यांच्या बागायतीचे संरक्षण व्हावे यादृष्टीने कायमस्वरुपी हत्ती हटाव मोहीम राबविण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवा. माकड, गवे, नीलगायी यासारख्या जंगली जनावरांचा वाढलेला उपद्रव रोखण्यासाठी सौरबॅटरी कुंपण योजना (सौरकुंपण) प्रभावीपणे राबविण्याबाबत तत्काळ कार्यवाही करा, अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी ओरोस येथील बैठकीत आज वन अधिकाऱ्यांना दिल्या. 

सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृह येथे श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हत्तींसह वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांचे नुकसान व जंगली प्राण्यांचा उपद्रव याबाबत बैठक झाली. आमदार वैभव नाईक, मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, वनक्षेत्रपाल सुभाष पुराणिक यांच्यासह पुष्पसेन सावंत, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, संजय पडते, अमरसेन सावंत, राजेंद्र जाधव, बाबा आंगणे, संदीप परब, विक्रांत सावंत आदी उपस्थित होते. 

बैठकीत हेवाळे सरपंच संदीप परब म्हणाले, ''दोडामार्ग तालुक्‍यात हत्तींचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू आहे. हत्तींना रोखण्यात वन विभागाचे प्रयत्न कमी पडत आहेत. हत्तींच्या भीतीने शेतकरी एकत्र येत रात्र जागवत आहेत. बागायती शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शासनाने हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.'' 

जिल्ह्यात हत्तींबरोबरच गवे, नीलगाय, माकड, डुक्कर अशी जंगली प्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. नारळ, सुपारी, केळी बागायती ओस पडल्या आहेत. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. याबाबत शासनाने योग्य तोडगा काढून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी पुष्पसेन सावंत यांनी केली. 

हत्तींच्या उपद्रवामुळे अनेक शेतकरी जायबंद झाले आहेत. काही मृतही पावले. अशा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वन विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. नुकसानीचे प्रस्ताव तयार केले जात नाहीत, असा आरोप प्रकाश दळवी यांनी केला. 

खासदार राऊत म्हणाले, ''कोल्हापूर जिल्ह्यातून हत्ती हटाव मोहिमेचा प्रस्ताव केंद्रस्तरावर पाठविला आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्गातून हत्ती हटाव मोहीम कायमस्वरूपी राबविण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाला पाठवावा.'' हत्तींपासून जीवितहानी व जखमी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, या बाबत वन विभागाने पंचनामे करून प्रस्ताव तयार करावा व तत्काळ नुकसानभरपाई (मदत) मिळवून द्यावी, अशी सूचना खासदार विनायक राऊत यांनी वन विभागाला केली. 

हत्तींसह जंगली जनावरांचा उपद्रव टाळण्यासाठी जिल्ह्यात सौरकुंपण योजना प्रभावीपणे राबवावी. जिल्ह्यात वन विभागाचे 22 हजार हेक्‍टर क्षेत्र वनक्षेत्र आहे. खासगी वनक्षेत्र 42 हजार हेक्‍टर आहे; मात्र वनसंज्ञा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबवावी, अवैध जंगलतोड होणार नाही याची वन विभागाने खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या. 

प्रमुख सूचना 
* हत्ती हटाव मोहीम प्रभावीपणे व कायमस्वरूपी राबवावी. 
* जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात जायबंद व मृत व्यक्तींना तत्काळ मदत मिळावी. 
* हत्तींसह जंगली प्राण्यांचा उपद्रव रोखण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा. 
* वनसंज्ञा केंद्राचे संरक्षण करून जंगलतोड रोखावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com