कोल्हापूर-राजापूर रेल्वेसाठी हवा निधीचा बूस्टर

कोल्हापूर-राजापूर रेल्वेसाठी हवा निधीचा बूस्टर

कोकण आणि घाटमाथ्यावरील कोल्हापूरला कोकण रेल्वेच्या माध्यमातून जोडणाऱ्या कोल्हापूर-राजापूर हा कोकण रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रस्तावित मार्ग आहे. या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण होऊन आराखडाही तयार झाला आहे. मात्र, निधीअभावी हे काम रखडले आहे.

कोल्हापूर बाजारपेठेच्या आणि पर्यटनदृष्ट्या समृद्ध असलेल्या कोकणच्या पर्यटन व्यवसायाच्या कक्षा अधिक रुंदावणार आहेत. नव्या ‘सेतू’ला निधीचा बूस्टर मिळून रखडलेल्या या कामाला गती मिळणे आवश्‍यक आहे. हा रेल्वे मार्ग सुमारे १०० किलोमीटरचा आहे. कोल्हापूर, मलकापूर, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर एकमेकांना जोडले जाणार आहेत. प्रस्तावित रेल्वेचा कोल्हापूर-कसबा बावडा- मनपाडळे- शाहूपुरी- सय्यदपुरी- मोरवडे- चांदोली- वाडीकणकवणे- वजरवाडी- बोर्ले- आडवली- विलवडे- राजापूर रोड स्थानक असा मार्ग राहणार आहे. सुमारे ३ हजार कोटी रुपयांची त्यासाठी आवश्‍यकता आहे.

मुंबईच्या तुलनेत कोल्हापूर जवळचे 
कोल्हापूर आणि कोकण यामधील अंतर राजापूर-गगनबावडामार्गे कोल्हापूरला गेल्यास ११० कि.मी. आहे. एसटी अथवा खासगी गाड्यांमधून हे अंतर गाठण्यासाठी सरासरी ३ ते ४ तास लागतात. मुंबईमध्ये जाण्यासाठी एसटीला कोल्हापूरच्या दुप्पट; किंबहुना त्याहून अधिक तास लागतात. त्यामुळे मुंबईच्या तुलनेत कोल्हापूरमध्ये जा-ये करण्यासाठी कमी कालावधी लागतो. मुंबई बाजारपेठ आणि कोल्हापूर बाजारपेठ यामधील वस्तूंच्या दरामध्ये फारशी तफावत नसते. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांकडून कोल्हापूरला घाऊक मालाची बाजारपेठ म्हणून अधिक पसंती दिली जाते. 

कोल्हापूर-कोकणातून कोटींची उलाढाल
कोल्हापूर आणि कोकण यामधील तुलनात्मकदृष्ट्या अंतर कमी असल्याने स्थानिक व्यापारी कोल्हापूर बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात मालाची आयात करतात. त्यातून दरदिवशी कोट्यवधीची उलाढाल होते. कोल्हापूर-कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोल्हापूर-कोकण (राजापूर) आर्थिक व्यवहारांमध्ये वाढ होईल. सध्या कोल्हापूर-कोकण तथा राजापूर नागमोड्या वळणांच्या रस्त्याने एकमेकांना जोडले गेले आहे. घाटातील या नागमोड्या वळणांच्या रस्त्यातून गाड्या हाकताना कठीण होऊन जाते. कोल्हापूर-राजापूर रेल्वे मार्ग झाल्याने प्रवासाचे अंतर कमी व सुखद होईल.

पर्यटन व्यवसायास भरभराट शक्‍य 
कोकणच्या निसर्गसौंदर्याचा फायदा घेऊन पर्यटन व्यवसाय बहरला नाही. मात्र, काही वर्षांमध्ये कोकणामध्ये पर्यटन व्यवसाय रुजू लागला आहे. त्याला पर्यटकांकडून प्रतिसादही चांगला मिळत आहे. त्यामधून आर्थिक उलाढालही समाधानकारक होत असल्याचे आश्‍वासक चित्र आहे. कोकण रेल्वेच्या या कोल्हापूर-राजापूर मार्गामुळे भविष्यात येथील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी घाटमाथा परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येतील.

सरासरी उत्पन्नात वाढीसाठी उपयुक्त
प्रसिद्ध हापूस आंब्यासह या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या विविध स्वरूपाच्या मालाला कोल्हापूरसारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सध्या कवडीमोल किमतीला विकल्या जाणाऱ्या येथील मालाचे भावही वाढतील. त्यातच येथील हापूस आंबा, काजू, मासळी वा तत्सम घटकांना कोल्हापूरसारखी घाऊक बाजारपेठ खुली होईल. कोकणच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे येथील पर्यटन व्यवसाय आणि त्यावर आधारित असलेला हॉटेल, लॉजिंग, वाहतूक आदी व्यवसायांमध्येही वृद्धी होणार आहे. 

माजी आमदार कदमांच्या प्रयत्नांना यश
नवा रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये विशेष प्रयत्न केले. त्यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून या मार्गाला मंजुरी मिळण्याच्या मागणीचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याला अखेर यश आले असून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या नव्या प्रस्तावित मार्गाला हिरवा कंदील दाखविला. 

दुष्काळावेळी कोकणातील पाणी शक्‍य
घाटमाथ्यावरील भागामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडतो. राजापूर तालुक्‍याच्या पूर्व भागामध्ये अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पासह अन्य धरणांचे प्रकल्प होत आहेत. रेल्वेच्या माध्यमातून या धरणातील पाणी घाटमाथ्यावरील दुष्काळी भागामध्ये वाहतूक करून नेणे शक्‍य होणार आहे. रेल्वेमध्ये एखादा डबा दुष्काळी कालावधीमध्ये पाण्याच्या वाहतुकीसाठी राखीव ठेवून वाहतूक करणे शक्‍य होणार आहे.

कोकण आणि कोल्हापूरला जोडणारा रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. या प्रस्तावित मार्गाचा कोकणाला विकासात्मक फायदा होणार आहे. या मार्गाचे सर्वेक्षण होऊन आराखडाही तयार झाला आहे. मात्र, या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी निधीची आवश्‍यकता आहे. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहोत. 
- गणपत कदम,
माजी आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com