ज्येष्ठ कवी द. बा. धामणस्करना कोमसापचा पुरस्कार जाहीर

मकरंद पटवर्धन
गुरुवार, 18 जानेवारी 2018

रत्नागिरी - कोकण मराठी साहित्य परिषदेचा कविता राजधानी पुरस्कार जुन्या जमान्यातील ज्येष्ठ कवी द. बा. धामणस्कर यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

रत्नागिरी - कोकण मराठी साहित्य परिषदेचा कविता राजधानी पुरस्कार जुन्या जमान्यातील ज्येष्ठ कवी द. बा. धामणस्कर यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 28 जानेवारीला कुडाळमध्ये पुरस्कार वितरण होणार आहे. पुरस्कार समितीचे निमंत्रक अरुण नेरूरकर यांनी 2016-17 सालच्या वाङ्‌मयेतर पुरस्कारांची घोषणा केली.

कुसुमाग्रजांनी मालगुंड केशवसुतनगरी ही कवितेची राजधानी आहे, असे म्हटले होते. त्यामुळेच कोमसापने आठ वर्षांपासून कविता राजधानी पुरस्कार देण्यास सुरवात केली. यापूर्वी सौमित्र, अरुण म्हात्रे अशा नामवंत कवींना हा पुरस्कार दिला आहे.

गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती वाङ्‌मयीन कार्यकर्ता पुरस्कार शिवाजी गावंडे (मुंबई) यांना, राजा राजवाडे स्मृती वाङ्‌मयीन कार्यकर्ती पुरस्कार साधना ठाकूर यांना जाहीर झाला. सन्मानचिन्ह, सन्मापत्र, 2000 रुपये असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. वामनाराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार कुडाळ शाखेला (सन्मानचिन्ह, दोन हजार रुपये) दिला जाईल. सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार ग्रामीण भागांतील स्त्री लेखिकांसाठी दिला जातो. यंदा तो कणकवलीच्या श्रीमती कल्पना धाकू मलये (सन्मानचिन्ह, दोन हजार रुपये) यांना देण्यात येणार आहे. (कै.) सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार महाविद्यालयीन लिहिता विद्यार्थी सौरभ नाईक यांना दिला जाईल. तसेच कवी उमाकांत कीर स्मृती काव्य पुरस्कार उमेदीच्या गुणवंत कवींना देण्याकरिता गिरिजा कीर यांनी पुरस्कृत केला आहे. यंदा हा पुरस्कार मुंबईच्या गुरुनाथ तेंडुलकर यांना देण्यात येईल. दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप एक हजार रुपये, सन्मानचिन्ह असे आहे.

(कै.) भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार साहित्य, पर्यावरण, शिक्षणात योगदान देणारे विरार-ठाणे येथील आजीव पाटील यांना देण्यात येणार आहे. श्री. बा. कारखानीस पुरस्कार साहित्य, पर्यावरणात विशेष योगदान देणारे लांजा येथील सुरेश खटावकर यांना जाहीर झाला आहे. (कै.) चंद्रकांत लक्ष्मण सावंत स्मृती पुरस्कार साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान देणारे नवी मुंबईतील पुंडलिक म्हात्रे यांना देण्यात येईल. या तीनही पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पाच हजार रुपये असे आहे.

Web Title: Ratnagiri News KOMSAP award to D B Dhamanskar