अखंड वाहणारे अश्रू अनं निशब्द दापोली

अखंड वाहणारे अश्रू अनं निशब्द दापोली

दापोली/खेड -  कोकण कृषी विद्यापीठातील ३० कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूचे सावट दुसऱ्या दिवशीही दापोलीवर आहे. शनिवारी (ता. २८) रात्री आलेल्या मृतदेहांवर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गिम्हवणेतील चौघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार झाले.

दापोलीत दुसऱ्या दिवशीही अघोषित बंद होता. दुकाने उघडण्याची हिंमतच होत नाही, ही प्रतिक्रिया अत्यंत प्रातिनिधिक होती. अंत्यसंस्कार झालेल्या स्थितीतून बाहेर येण्याआधीच आणखी कोणाचा तरी मृतदेह आला, असे कळले की पुन्हा हळहळ, आक्रोश सुरू होतो. ज्या कोणाचे आप्तस्वकीय गेले, त्यांच्या दुःखाला पारावार नाहीच, परंतु दापोलीवर झालेला आघात एवढा मोठा आहे की, त्यातून शहराला सावरायलाही वेळ लागणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात भर घालणाऱ्या या कर्मचाऱ्यांची उणीव दापोलीला सतत भासणार अशी भावूक प्रतिक्रिया प्रत्येक ठिकाणच्या चर्चेत ऐकू येत होती.अखंड वाहणारे अश्रू अनं निशब्द दापोली,असेच सारे वातावरण होते.

महाबळेश्‍वरकडे जाताना आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात दापोलीतील ३० जण मृत्युमुखी पावले.त्यामुळे साऱ्या दापोली तालुक्‍यावर शोककळा पसरली. आज दुसऱ्या दिवशीही दापोली बाजारपेठ बंदच ठेवण्यात आली.अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचे, नातेवाइकांचे अश्रू पुसण्याची आमची हिंमत राहिली नाही, ही प्रतिक्रिया प्रातिनिधिक होती. 

शनिवारी सायंकाळपासून दापोलीकरांनी दापोली ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. मध्यरात्री काही मृतदेह घटनास्थळावर एनडीआरएफच्या जवानांच्या हाती लागले, अशी माहिती मिळताच दापोलीच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थ उपजिल्हा रुग्णालयात पोचले होते. दापोलीत अशी दुर्दैवी घटना पहिल्यांदाच घडली आहे. बाजारपेठेतील दुकाने उघडण्याची देखील आमची मनस्थिती नाही, अशी प्रतिक्रिया जयवंत शिंदे यांनी दिली. आम्ही आमच्या रोटरी क्‍लबच्यावतीने सर्व मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबीयांसाठी काय करता येईल या विचाराने आमच्या परीने प्रयत्न करणार आहोत.

ही सर्व नवतरुण मंडळी आमच्या सोबत दररोज भेटणारी होती. त्यामुळे आम्हाला धक्का आहे. सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संदीप सुवरे यांच्यासारखे आमचे खूप जुने मित्र आम्ही या अपघातात गमावलेले आहेत. त्यामुळे दापोलीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, अशी भावूक प्रतिक्रिया समीर तलाठी यांनी दिली.

चौघे कर्ते गमावले, कुणी कुणाला सांभाळायचे?

दापोली कृषी विद्यापीठातून सहलीला गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाडीत गिम्हवणे-झगडेवाडीतील चौघेजण होते. चौघांचाही या अपघातात मृत्यू झाला.त्यामुळे वाडीवर दुःखाचे सावट होते. या चौघांची घरे शेजारी-शेजारी आहेत. घरातील कर्ते पुरुष गेल्यामुळे कुणी कुणाला सांभाळायचे अशीच परिस्थितीत निर्माण झाली. झगडेवाडीने सुन्नपणे रात्र जागून काढली.

शनिवारी आंबेनळी घाटातील दरीत बस कोसळल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ही बातमी दापोलीत धडकली.या बातमीमुळे सारी दापोलीच सुन्न झाली. गिम्हवणेतील चौघे गेल्याने साऱ्या झगडेवाडीवर शोककळा पसरली. गिम्हवणेतील हे चौघे तरुण गावच्या सर्वच कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होत.संतोष झगडे व संजीव झगडे हे सख्खे चुलत भाऊ होते. संतोष हा कृषी विभागाच्या प्रशासकीय विभागात काम करीत होता. संजीव हा कृषी विभागात लिपिक होता. या दोघांच्या पाठीमागे आज त्यांचे कुटुंबीय संकटात पडले आहेत. संतोषच्या मागे पत्नी, आई -वडील व एक दहा, तर एक सात वर्षांची मुलगी आहे. संजीवच्या पश्‍चात पत्नी, आई, एक लहान मुलगी व तीन भाऊ असा परिवार आहे.

सचिन झगडे हा गिम्हवणे पंचक्रोशीत ‘बाळा’ या टोपण नावाने ओळखला जात होता. तो कृषी विद्यापीठाच्या सामान्य शाखा विभागात कार्यरत होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, एक सात वर्षांची मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे. संदीप झगडे हा कृषी विभागात वाहनचालक होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई-वडील व एक आठ वर्षांचा मुलगा आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत संतोष, संजीव व सचिन यांचे मृतदेह मिळाले होते. ते दापोली येथे पाठविण्यात आले. परंतु संदीपचा मृतदेह रात्री साडेअकरा वाजेपर्यंत हाती आला नव्हता. त्यामुळे झगडे कुटुंबीयांनी तीनही मृतदेह दापोली रुग्णालयात ठेवले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com