मृतदेह दरीतून काढणारे सारे शेतकरी युवक

मृतदेह दरीतून काढणारे सारे शेतकरी युवक

दाभोळ - आंबेनळी घाटातील ही दुर्घटना आम्ही कधीही विसरू शकणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघातामध्ये प्राणहानी होणे हे आम्ही पहिल्यांदाच अनुभवले आहे. एवढे मृतदेह दरीतून आम्ही कधीच बाहेर काढले नाहीत. आमच्या टीमचे सदस्य हे महाबळेश्वरनजीकच्या खेडेगावात काम करणारे शेतकरी युवक आहेत. त्यांना दुधाच्या मोठ्या कळशा डोक्‍यावर घेऊन दरीतून वाट काढत येण्याचा अनुभव आहे. हेच त्यांचे या क्षेत्रातील क्वालिफिकेशन आहे.   

बस दुर्घटनेतील विद्यापीठाच्या एकाही कर्मचाऱ्याला आम्ही वाचवू शकलो नाही,अशी खंत व्यक्त करणारे महाबळेश्वर ट्रेकर्सचे प्रमुख सुनील भाटिया ‘सकाळ’शी बोलत होते. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांची भेट घेतल्यावर त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले , आम्ही महाबळेश्वर येथे काम करतो, तिथे पूर्वी दरीत उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण खूप होते. आता ते कमी झाले आहे. आमची महाबळेश्वर ट्रेकर्सची २७ जणांची टीम आहे. त्यादिवशी आम्ही आळीपाळीने काम केले. यातील अनेकांना दऱ्यातील अनुभव असून त्यांना वेगळे ट्रेनिंग दिलेले नाही. 

२८ जुलैला आम्हाला ही घटना ११.१५ वाजण्याच्या सुमारास कळल्यावर आम्ही लगेचच घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरवात केली. इतर ठिकाणाहूनही मदतीसाठी या क्षेत्रात काम करणारे ट्रेकर्स तेथे आले व आम्ही एक टीम वर्क म्हणून हे काम केले. एनडीआरफचे जवान मदतीला आल्यावर त्यांच्याकडे असलेल्या अत्याधुनिक साधनांनी मृतदेह शोधण्याचे काम सुरू झाले. भाटिया यांच्यासोबत  अनिकेत वाघदरे, सोमनाथ वाघदरे, प्रवीण देशमुख, जयवंत बिरामणे असे सहकारी होते. कुलगुरू डॉ. भट्टाचार्य यांनी या टीमला त्यांनी केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद दिले. 

‘एनडीआरएफ’च्या जवानांची कमाल
गाडीच्या टपाखाली सहा ते सात मृतदेह अडकले होते. महावितरणने दरीत वीजपुरवठा केल्यावर कटरच्या सहाय्याने पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन ते तीन मृतदेह दगडाखाली अडकले होते. ते बाहेर काढणे कठीण होते. मात्र, ‘एनडीआरएफ’च्या जवानांना दुसऱ्या दिवशी ते बाहेर काढण्यात यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com