वणंदचा सचिन गुजर परत येईल

सिद्धेश परशेट्ये
रविवार, 29 जुलै 2018

खेड - ‘आमचा सचिन गेलाच नाही, अपघाताची माहिती आम्ही टीव्हीवर पाहिली, परंतु आम्हाला अद्यापही विश्‍वास आहे. सचिन जिवंत आहे’ तो परत येईल, अशी सुप्त आशा वणंदमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

खेड - ‘आमचा सचिन गेलाच नाही, अपघाताची माहिती आम्ही टीव्हीवर पाहिली, परंतु आम्हाला अद्यापही विश्‍वास आहे. सचिन जिवंत आहे’ तो परत येईल, अशी सुप्त आशा वणंदमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

दापोली येथील कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्‍वर येथे चालली होती. जाताना या बसला महाबळेश्‍वर येथील आंबेनळी घाटात अपघात झाला. अपघातात वणंद येथील सचिन गुजर हे कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभागात कार्यरत होते. सचिन यांचे काही नातेवाईक या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाण्यासाठी निघाले, पण सचिन यांच्या अपघाती जाण्याने वणंद गावावर शोककळा पसरली आहे.

ही दुर्दैवी घटना टीव्हीवर पाहिली, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे; परंतु आमचा सचिन या अपघातात गेलाच नाही, अशी आशा सचिनचे चुलते अनंत गुजर यांनी बोलून दाखविली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गावातील सर्व ग्रामस्थांनी सचिनच्या घराकडे धाव घेतली. त्यांच्या घरी वृद्ध वडील व सचिनची पत्नी व दोन लहान मुले आहेत. सचिन हा पायाने थोडासा अपंग होता; परंतु त्याने त्यांचे अपंगत्व त्यांच्या कामाच्या कधीही आड येऊ दिले नाही.

गावातही सचिन खूपच कृतिशील होता. गावच्या अमर विचार मंडळाचा तो उपाध्यक्ष होता. गावच्या सर्वच कार्यक्रमामध्ये तो हिरिरीने सहभागी होत असे. आज पहाटे सहलीला जाताना पत्नी व वडिलांना तो रविवारी (ता. २९) परत येईन असे सांगून गेला होता, अशी माहिती सचिनचे चुलते अनंत गुजर यांनी दिली. सचिनचा चुलतभाऊ अविनाशला ही घटना समजल्यानंतर तो तत्काळ काही मित्रमंडळींना घेऊन घटनास्थळी गेला आहे.

Web Title: Ratnagiri News Konkan Agriculture University Bus accident special