राष्ट्रवादीला विजयाची हॅट्रीक साधण्याची संधी

मुझफ्फर खान
मंगळवार, 12 जून 2018

चिपळूण - कोकण पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांना रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव सुनील तटकरे यांनी घेतली आहे. 

चिपळूण - कोकण पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांना रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव सुनील तटकरे यांनी घेतली आहे. 

कोकण मतदारसंघातील सर्वच निवडणुकांचा सुनील तटकरे यांना दांडगा अनुभव आहे. मुलगा अनिकेत, शिक्षक आमदार कपिल पाटील यांना निवडून आणून शिवसेना, भाजपची मक्तेदारी मोडून काढण्यात तटकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नजीब मुल्ला यांना विजयी करून विजयाची हॅट्रीक साधण्याची संधी तटकरे यांना आहे. 

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस अगोदर विद्यमान आमदार डावखरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी पदवीधर मतदारसंघासाठी तिकीट मिळवले. त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे ऐनवेळी नजीब मुल्ला यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

मतदारसंघातील एकूण मतांपैकी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सर्वाधिक 60 टक्के मतदार आहे. पहिल्या पसंतीची मते मिळण्यासाठी मुल्ला व ठाणे, नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या नेत्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. उर्वरित 40 टक्के मतांपैकी सर्वाधिक मते मिळवण्याची जबाबदारी पक्षाचे महासचिव सुनील तटकरे यांनी घेतली आहे.

त्यांच्या मदतीला आमदार भास्कर जाधव, संजय कदम आणि माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकमही मैदानात उतरले आहेत. या तीन जिल्ह्यात 40 टक्के मतदार आहेत. यातील किती टक्के मतदान मुल्ला यांना होईल. आकड्यांची जुळवाजुळव करण्यात माहीर असलेले तटकरे कोकण पदवीधर मतदार संघासाठी कशी जुळवाजुळव करतात याकडे कोकणवासियांचे लक्ष लागले आहे. 

 

Web Title: Ratnagiri News Konkan Graduate constituency election