शिवसेनेकडून योगेश कदम यांच्यावर कोकण पदवीधरची जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

खेड - कोकण पदवीधर मतदारसंघातून सेनेने खेड तालुक्‍यातील कांदोशीचे सुपुत्र व ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीची जबाबदारी युवा सेनेचे नेते योगेश कदम यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खेड - कोकण पदवीधर मतदारसंघातून सेनेने खेड तालुक्‍यातील कांदोशीचे सुपुत्र व ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीची जबाबदारी युवा सेनेचे नेते योगेश कदम यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन महिन्यांपूर्वी सिनेट निवडणुकीत सेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. या विजयात योगेश कदम यांचा सिंहाचा वाटा होता. यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची जबाबदारी योगेश कदमांकडे सोपवली आहे. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी सेनेची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत हा निर्णय झाला. सेनेचे उमेदवार मोरे यांनी ग्रामदैवता श्री रामवरदायिनी देवीचे दर्शन घेऊन प्रचारास प्रारंभ केला. 

कोकण पदवीधर निवडणुकीत मागील वेळी निरंजन डावखरे यांनी बाजी मारली होती. डावखरे यांनी भाजपत प्रवेश केला असून कोकण पदवीधरसाठी भाजपतर्फे डावखरे यांनाच मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. सेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी  योगेश कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे.

गेले अनेक महिने संपूर्ण पदवीधर मतदारसंघात योगेश कदम, पवन जाधव, सिद्धेश कदम यांच्यासह युवा कार्यकर्ते कोकण पट्ट्यात कार्यरत आहेत. आमदार उदय सामंत, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहन बने यांच्यासह तळागाळातील कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. सेनेच्या या शिलेदारांच्या कामगिरीमुळे ही निवडणूक मात्र भाजप किंवा राष्ट्रवादीला सोपी जाणार नाही,अशी शक्‍यता वर्तवली आहे.

Web Title: Ratnagiri News Konkan graduate Constituency special