घराणेशाहीचा आरोप पुसण्याची सुनील तटकरे यांना संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

चिपळूण - विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जे कष्ट घेतले तसेच कष्ट तटकरे यांनी पदवीधर मतदारसंघासाठी घेतल्यास राष्ट्रवादीला पदवीधर मतदारसंघावरील वर्चस्व कायम राखणे सहज शक्य आहे.

चिपळूण - विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जे कष्ट घेतले तसेच कष्ट तटकरे यांनी पदवीधर मतदारसंघासाठी घेतल्यास राष्ट्रवादीला पदवीधर मतदारसंघावरील वर्चस्व कायम राखणे सहज शक्य आहे. घराणेशाहीचा आरोप पुसून काढण्यासाठी तटकरेंना ही नामी संधी असल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी मिळाली आहे. कार्यकर्त्यांमागे तटकरे किती बळ उभे करतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. 

सुनील तटकरे यांनी महत्त्वाची पदे आपल्या घरात ठेवली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत आहे. नुकतेच झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून त्यांनी मुलगा अनिकेत तटकरे याला निवडून आणले. माजी आमदार गणेश नाईक यांना ही जागा हवी होती. तटकरे यांनी आपले वजन वापरून ती मुलासाठी मिळवली. त्यामुळे नाईक नाराज होते. आमदार भास्कर जाधव यांना विश्‍वासात न घेतल्यामुळे तेही नाराज होते. पक्षांतर्गत नाराजी असताना तटकरे यांनी विधान परिषदेत मोठ्या फरकाने मुलाला निवडून आणले. राष्ट्रवादीने घराणेशाहीचा आरोप पुसून काढण्यासाठी एका कार्यकर्त्याला निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी तटकरे किती मेहनत घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

गणेश नाईकांची भूमिकाही महत्त्वाची

अनिकेत तटकरेंच्या विजयासाठी तटकरे यांना भाजपची साथ लाभली. नारायण राणे हेही तटकरे यांच्या मदतीला धावले. त्यामुळे तटकरे त्याची परतफेड करणार की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ देणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. नवी मुंबईतून मुल्ला यांच्या मागे गणेश नाईक किती बळ उभे करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Ratnagiri News Konkan graduate election special