कोकण पदवीधर मतदारांमध्ये वीस हजाराने घट

कोकण पदवीधर मतदारांमध्ये वीस हजाराने घट

देवरूख - कोकण पदवीधर मतदारसंघातील लढती चार दिवसांतच स्पष्ट होतील. येथे शिवसेना-भाजपमध्ये टक्‍कर असून राष्ट्रवादीचा उमेदवार किंगमेकर ठरण्याची शक्‍यता आहे. मतदारांमध्ये झालेली घट चिंतेचा विषय असून तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

१९८८ ला कोकण पदवीधर मतदारसंघाची निर्मिती झाली. यात पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे भाग येतात. १९८८ ला यात केवळ ६ हजार मतदार नोंदणी झाली. त्यावेळी भाजपचे वसंतराव पटवर्धन विजयी झाले. १९९४ ला मतदार संख्या दुप्पट होऊन १२ हजार झाली. त्यावेळी भाजपचे डॉ. अशोक मोडक विजयी झाले. 

२००६ ला ६६ हजार मतदार होते. त्यावेळी भाजपचे संजय केळकर यांनी राष्ट्रवादीचे नीलेश चव्हाण यांचा २ हजार मतांनी पराभव केला. २०१२ मध्ये मतदार संख्या पुन्हा दुपटीने वाढून १ लाख ९ हजार झाली. यावेळी राष्ट्रवादीने जोर लावत निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली. दुरंगी निवडणुकीत डावखरे यांना २७ हजार ६३३, तर भाजपचे संजय केळकर यांना २२ हजार ९२ मते मिळाली. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपच्या हातून निसटला. 

२०१२ मधील निवडणुकीत १ लाख ९ हजार मतदार होते. आताच्या निवडणुकीसाठी ९० हजार २५२ मतदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये २० हजारांनी घट झाली आहे. मतदारसंघात ९४ मतदान केंद्र आहेत. सद्यःस्थितीत राष्ट्रवादीने नजीब मुल्ला, शिवसेनेने संजय मोरे, भाजपने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. तिसऱ्या आघाडीचे ॲड. पाटील हेसुद्धा  रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. यामुळे निवडणूक तिरंगी की चौरंगी होणार याचे उत्तर काही दिवसांतच मिळणार आहे.

रत्नागिरीतील तालुकानिहाय मतदार
 मंडणगड- ३५६,
 दापोली- १४३३, 
 खेड- १८१२, 
 चिपळूण- ३३२०, 
 गुहागर- ९६४, 
 संगमेश्‍वर- १५४१, 
 रत्नागिरी- ४२३६, 
 लांजा- ४८५, 
 राजापूर- ९४९.

जिल्हानिहाय मतदार संख्या
पालघर- १५ हजार १३५
ठाणे- ३७,२५४

रायगड- २४,१५८
रत्नागिरी- १५,५०७
सिंधुदुर्ग- ४,५८७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com