कोकणचा हापूस आखाती देशांकडे रवाना

राजेश कळंबटे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - ओखी, थंडीचा वाढलेला कडाका, ढगाळ वातावरण याचा सामना करत रत्नागिरी हापूस वाशी बाजारात दाखल झाला असून, त्याला दरही समाधानकारक मिळत आहे; मात्र मार्चमधील उत्पादनात चाळीस टक्‍के घट होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

रत्नागिरी - ओखी, थंडीचा वाढलेला कडाका, ढगाळ वातावरण याचा सामना करत रत्नागिरी हापूस वाशी बाजारात दाखल झाला असून, त्याला दरही समाधानकारक मिळत आहे; मात्र मार्चमधील उत्पादनात चाळीस टक्‍के घट होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

दरम्यान, राज्यातील बाजारपेठांबरोबरच आखातात निर्यातीला प्रारंभ झाला असून, पहिली कन्साईनमेंट दोन दिवसांपूर्वी वाशीतून रवाना झाली.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गल्फ देशांमध्ये सर्वांत आधी हापूस निर्यात सुरू झाली आहे. वाशीत जाणाऱ्या एकूण आंब्यापैकी चाळीस टक्‍के आंबा आखाती देशांकडे पाठविला जातो. पहिल्या टप्प्यात सुमारे पाचशे बॉक्‍स पाठविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी समुद्रमार्गे आंबा रवाना झाला असून, आखातात जाण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. तेथे पोचल्यानंतर दर समजेल, असे वाशी बाजार समितीकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी, देवगड येथील काही आंबा बागांची पाहणी केल्यानंतर हंगामाचा अंदाज आला आहे. मार्चमध्ये कमी उत्पादन राहील. मेमध्ये सर्वाधिक आंबा येईल. दर कसा राहील याची मांडणी आताच करणे शक्‍य नाही.
- संजय पानसरे,
घाऊक व्यापारी, वाशी फळ मार्केट.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांतून वाशी बाजारात दररोज पाचशे ते सहाशे पेट्या सरासरी पाठविल्या जात आहेत. सोमवारी (ता. १२) एका दिवसात बाराशे पेट्या गेल्या. तीन ते सहा हजार रुपये दर पेटीला मिळत असून, पहिल्या दर्जाच्या आंब्याला आठ ते नऊ हजार रुपयेही पेटीला मिळतात. वातावरणातील बदलामुळे हापूसच्या उत्पादनात घट होईल, अशी भीती सुरवातीपासून वर्तविली जात होती. ओखी वादळापाठोपाठ पुनर्मोहोराचे (रिफ्लॉवरिंग) संकट बागायतदारांपुढे होते. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे तुडतुड्याचा हल्ला झाला. यामध्ये पहिल्या तीन टप्प्यात अपेक्षित उत्पादन मिळू शकले नाही.

दहा वर्षांपूर्वीची स्थिती
दहा वर्षांपूर्वी कोकणातील हापूस बाजारात पाठविण्याचा मुहूर्त पाडव्याला केला जात असे. त्यापूर्वी बाजारातील आवक अत्यंत कमी असायची. गेल्या काही वर्षांत चित्र बदलले. आंबा जानेवारीत पाठविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. काहीवेळा दर्जाबाबतही तक्रारी येत होत्या. यावर्षी निसर्गाने केलेल्या किमयेमुळे पुन्हा सर्वाधिक आंबा एप्रिलमध्ये मुंबईकडे रवाना होईल. मेमध्ये अधिक उत्पादन राहील.

चौथ्या टप्प्यातील मोहोराची फूट चांगली होत आहे. त्यातून १५ एप्रिलनंतर चांगल्याप्रकारे उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. सध्या थंडी आणि ऊन असे पूरक वातावरण असल्याने वाढही समाधानकारक आहे. मेमध्ये उशिरापर्यंत आंबा बाजारात दाखल होईल. त्या वेळी दरात मोठी घसरण होण्याची शक्‍यता आहे. फेब्रुवारीतील स्थिती पाहता जिल्ह्यातून जाणारा आंबा गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. मार्चमध्ये त्यात चाळीस टक्‍के घट होईल. यावर्षी कर्नाटकचा आंबा उशिराने दाखल होणार असल्याने रत्नागिरी हापूसला त्याचे मोठे आव्हान आहे. केरळ आणि तमिळनाडू येथील आंबा येत्या काही दिवसांत वाशीत येणार असल्याचे तेथील व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

Web Title: Ratnagiri News Konkan Hapus Export