मॅजिक फिगर गाठणे ही तटकरेंची डोकेदुखी 

मुझफ्फर खान
सोमवार, 7 मे 2018

चिपळूण - कोकण मतदार संघातून राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत यांना उमेदवारी दिली. पुत्राच्या विजयासाठी सुनील तटकरे यांनी स्वाभिमान, शेकाप, मनसे या पक्षांचा पाठिंबा मिळवला. परंतु पक्ष आणि गृहकलह त्यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची भिती आहे.

चिपळूण - कोकण मतदार संघातून राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत यांना उमेदवारी दिली. पुत्राच्या विजयासाठी सुनील तटकरे यांनी स्वाभिमान, शेकाप, मनसे या पक्षांचा पाठिंबा मिळवला. परंतु पक्ष आणि गृहकलह त्यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची भिती आहे. अनिकेत यांचा अर्ज भरताना आमदार भास्कर जाधव, विक्रांत जाधव, आमदार अनिल व अवधूत तटकरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली . 

जाधव आणि तटकरे यांच्यामध्ये कोकणच्या नेतेपदावरून वाद आहे. जाधवांचे पुत्र विक्रांत हे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत. अनिकेत तटकरे यांचा अर्ज भरताना दोघेही अनुपस्थित होते. अनिल तटकरे या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची मुदत जूनमध्ये संपते. अनिल यांचा पत्ता कापून राष्ट्रवादीने त्यांच्या पुतण्याला संधी दिल्याने ते नाराज आहेत. अनिल तटकरे यांचा पत्ता कट होण्यामागे कुटुंबातील अंतर्गत वाद असल्याची चर्चा आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तटकरे कुटुंबीयातील वाद संपला असे जाहीर करण्यात आले. मात्र या दोघांची अनुपस्थिती वेगळेच सांगत आहे. अनिल तटकरे यांच्यासह खोपोलीचे माजी नगराध्यक्ष व पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ता मसूरकर विधान परिषदेसाठी इच्छुक होते. त्यांनी अनेकांच्या गाठीभेटीही घेतल्या होत्या. संधी न मिळाल्याने तेही नाराज आहेत. पक्ष आणि घरातील नाराजी वेळीच दूर झाली नाही तर विजयाची मॅजिक फिगर गाठताना तटकरेंची डोकेदुखी वाढणार आहे. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीत आम्ही अनिल तटकरे यांचेच काम करणार आहोत. आम्ही कोणावरही नाराज नाही. नियोजित कार्यक्रमामुळे उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित नव्हतो.

- विक्रांत जाधव, विरोधी पक्षनेते, रत्नागिरी जिल्हा परिषद

Web Title: Ratnagiri News Konkan Legislative Council Election