रिफायनरीविरोधात राणेंची 8 फेब्रुवारीला सभा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली 8 फेब्रुवारीला नाणार परिसरात जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती माजी खासदार नीलेश राणे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. रिफायनरीबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे, हे आता उघड झाले आहे. प्रकल्प रद्द करण्याची ताकद फक्‍त राणे यांच्यामध्येच आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

ते म्हणाले, 'पेट्रो केमिकलमुळे होणारा काळा धूर कोकणात नको, ही पहिल्यापासून भूमिका आहे. शिवसेनेची भूमिका सतत बदलत असल्याने त्यांचा खरा चेहरा जनतेपुढे आला आहे. अधिसूचना काढणारे त्यांचेच मंत्री आहेत. तरीही प्रकल्पाविरोधात बोलत आहेत. जनतेची साथ राणे कधीच सोडत नाहीत. नाणारची रिफायनरी सरकारने जिथे न्यायची तिकडे नेऊ दे; पण कोकणात नको. स्वाभिमान "एनडीए'चा घटक पक्ष असला, तरीही कोकणात रिफायनरी नको, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.''

खासदार विनायक राऊत वारंवार राणेंचे नाव घेत आहेत. त्यांचा इंट्रेस्‌ प्रकल्प रद्द करण्यापेक्षा राणेंमध्ये अधिक आहे. ती क्षमता राऊतांमध्ये नाही. त्यासाठी अभ्यास असावा लागतो.

Web Title: ratnagiri news konkan news refinery nilesh rane meeting