कोकण रेल्वे दुपदरीकरणाचे काम २६ ला रोखण्याचा अंजनी ग्रामस्थांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

चिपळूण - कोकण रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम २६ जानेवारीला रोखण्याचा निर्णय अंजनी येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांची बैठक झाली.

चिपळूण - कोकण रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम २६ जानेवारीला रोखण्याचा निर्णय अंजनी येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांची बैठक झाली. या वेळी हा निर्णय घेण्यात आला.

अंजनी रेल्वे स्थानकामुळे गावाचे दोन भाग झाले. दोन्ही भागांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. भुयारी मार्गातून संपर्क जोडण्याची मागणी या भागातील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करीत आहेत; परंतु रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. आज अंजनी येथे झालेल्या बैठकीला शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र आंब्रे, शांताराम खानविलकर, माजी सरपंच संतोष कान्हेरे, तंटामुक्त अध्यक्ष मधुकर अडरेकर, रवींद्र दिवाळे, गजानन पवार, विनायक पवार, अशोक तांबे आदी उपस्थित होते.

नागरिकांची गर्दी बघून खेड पोलिस ठाणे व रेल्वे पोलिस दलातील कर्मचारी अंजनी स्थानकावर पोहोचले. कोकण रेल्वे मार्गाची पाहणी करण्यासाठी आलेले वरिष्ठ सुरक्षा अधिकारीही त्या ठिकाणी थांबले. या वेळी शौकत मुकादम यांनी त्यांना स्थानिक नागरिकांच्या समस्यांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘भुयारी मार्ग झाला तर भैरवली, अंजनवेल, सवनस, कर्जी, शिर्षी, मुंबका ही खाडीपट्ट्यातील गावे लोटे एमआयडीसीशी जोडली जाणार आहेत. ग्रामस्थांच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. आठ दिवसांत निर्णय न झाल्यास आम्ही दुपदरीकरणाचे काम थांबवणार आहोत.’’ 

आमदार भास्कर जाधवांचाही पाठिंबा
चिपळूण-गुहागर-खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या सूचनेनुसार मी आज अंजनी येथील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती आमदार भास्कर जाधव यांना दिली. त्यानी ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. या लढ्यात तेही आमच्याबरोबर असल्याची माहिती शौकत मुकादम यांनी पत्रकारांना दिली.

Web Title: Ratnagiri News Konkan Rail Anjani Gram issue