कोकण रेल्वे चाकरमान्यांनी ‘फुल्ल’

राजेश कळंबटे
रविवार, 13 मे 2018

रत्नागिरी - उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चाकरमान्यांची पावले कोकणाकडे वळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या फुल्ल आहेत. पॅसेंजरमध्ये बसण्यासाठीच नव्हे तर उभे राहण्यासाठीही जागा मिळत नाही. एक्स्प्रेसच्या आरक्षीत डब्यातही गर्दी होत आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजरला समांतर गाडी सोडली तर हा प्रश्‍न सुटेल अशी मागणी होत आहे.

रत्नागिरी - उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चाकरमान्यांची पावले कोकणाकडे वळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या फुल्ल आहेत. पॅसेंजरमध्ये बसण्यासाठीच नव्हे तर उभे राहण्यासाठीही जागा मिळत नाही. एक्स्प्रेसच्या आरक्षीत डब्यातही गर्दी होत आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजरला समांतर गाडी सोडली तर हा प्रश्‍न सुटेल अशी मागणी होत आहे.

कोकणात येण्यासाठी रेल्वेला पहिली पसंती दिली जाते. त्यामुळे सुट्टीच्या काळात कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांना प्रचंड गर्दी असते. गाडीत चढण्यासाठीही जागा मिळत नाही. मेच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या भरुन येत आहेत. दादर पॅसेंजरसह रात्री दादरहून सुटणारी कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेसला लोकांची सर्वाधिक पसंती आहे. दादर स्थानकावर सर्वसाधारण डब्यांसाठी रांगा लावण्याची सवय केली आहे. परंतु गाडी स्थानकावर लागल्यानंतर प्रवाशांच्या लोंढ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.

आरक्षित यादी सहाशेपर्यंत गेल्यामुळे तिकिट विक्रीच बंद करण्यात आली आहे. आरक्षणातील प्रवासी त्या डब्यांचा आधार घेतात. त्यामुळे गर्दीत आणखीच भर होत आहे. सर्वसाधारण डब्यांतील शौचालयातही बसून प्रवास करणारे आहेत. पॅसेंजरमधील अवस्था आणखीनच बिकट आहे. प्रत्येकाला घरी पोचण्यासाठी घाई असल्याने गाडी जागा मिळविण्यासाठी धडपडत असतो. काही प्रवास तर थेट साहित्य ठेवण्याच्या स्टॅण्डवर बसून प्रवास करताना दिसून येतात.

यावर्षी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्यात आल्या असल्या तरीही पॅसेंजरला पर्यायी गाडीची व्यवस्था केलेली नाही. गतवर्षी हाच फंडा वापरण्यात आला होता. त्याचा निश्‍चितच प्रवाशांना फायदा झाला होता. तसेच जादा गाड्यांची माहिती प्रवाशांना नसल्याने त्यांची पावले आपसूकच नियमित गाड्यांकडे वळतात. याबाबत रेल्वे प्रशासनाकडूनही योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे.

पनवेल ते चिपळूणपर्यंत एक पॅसेंजर सुरु केली तर प्रवाशांना फायदा होईल. तसेच अन्य गाड्यांमधील जनरल डब्यांमध्ये होणारी गर्दी कमी होईल.

- शेखर, प्रवासी

Web Title: Ratnagiri News Konkan Railway Passenger Full