कोयना धरणातून यावर्षीही पाणी सोडणार

मुझफ्फर खान
शुक्रवार, 1 जून 2018

चिपळूण - कोयना धरणात 10 टीएमसीहून अधिक अतिरिक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कोयना धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाणी कोयना नदीत सोडण्याची शक्यता आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी पूर्ण क्षमतेने पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

चिपळूण - कोयना धरणात 10 टीएमसीहून अधिक अतिरिक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कोयना धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाणी कोयना नदीत सोडण्याची शक्यता आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी पूर्ण क्षमतेने पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाळ्यातही धरणाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता मयुर शेंडगे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. चिपळूण तालुक्याला या पाण्यामुळे कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले. 

कोयना धरणात 29.40 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 10 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा आहे. अतिरिक्त पाण्याचे नियोजन करण्यासाठी कोयना धरण व्यवस्थापन विभाग आणि महानिर्मिती कंपनीकडून प्रयत्न सुरू आहे. कोयना प्रकल्पाचा चौथा टप्पा केवळ मागणीच्या काळात चालू केला जातो. मात्र कोयना धरणातील अतिरिक्त पाण्याचे नियोजन आणि वाढत्या उन्हाळ्यात वीजेची मागणी लक्षात घेवून या टप्यातून अतिरिक्त वीज निर्मिती सुरू आहे. तरीही पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणातील अतिरिक्त पाणी कमी करणे शक्य नाही. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून धरणातील पाणी कोयना नदीत सोडले जाण्याची शक्यता आहे. 

कोयना, महाबळेश्‍वर, हेळवाक हे कोयना धरणाचे पाणीलोट क्षेत्र आहे. या भागात पडणार्‍या पावसाचे पाणी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात येते. यावर्षी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 97 टक्के पाऊस होईल. असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पूर्ण क्षमतेने पाऊस झाला तर 15 ऑगस्टपूर्वीच धरण पूर्ण क्षमतेने भरेल. त्यानंतर धरणात येणारे पाणी धरणाचे वक्र दरवाजे उघडून ते कोयना नदीत सोडले जाईल. 

चिपळूणला धोका नाही

कोयना धरणातील पाण्यावर पश्‍चिमेकडील टप्पा 1 आणि 2 मध्ये वीज निर्मिती केली जाते. त्यानंतर ते पाणी सह्याद्रीच्या खोर्‍यातील चौथ्या टप्याकडे वळविले जाते. चौथ्या टप्यात वीज निमिर्ती झाल्यानंतर ते पाणी कोळकेवाडी धरणात आणले जाते. कोळकेवाडी धरणाच्या पायथ्याशी तिसरा टप्पा आहे. तिसर्‍या टप्यात वीज निर्मिती झाल्यानंतर ते पाणी अवजल कालव्याने अरबी समुद्राकडे सोडले जाते. पश्‍चिमेकडील सोडण्यात येणार्‍या पाण्याला कंट्रोलींग सिस्टम असल्यामुळे त्या पाण्याचा धोका चिपळूणातील नागरिकांना नाही. असे स्पष्टीकरण श्री. शेंडगे यांनी दिले.

Web Title: Ratnagiri News Koyana Dam water dispatch