कोयना जलविद्युत प्रकल्प पर्यटकांसाठी बंद

मुझफ्फर खान
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

चिपळूण - केंद्रीय गुप्तचर विभागाच्या सूचनेनुसार कोयना जलविद्युत प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. देशात वाढलेल्या अतिरेकी कारवाया लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली आहे. 

चिपळूण - केंद्रीय गुप्तचर विभागाच्या सूचनेनुसार कोयना जलविद्युत प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. देशात वाढलेल्या अतिरेकी कारवाया लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली आहे. 

केंद्रीय गुप्तचर विभाग नवी दिल्ली, मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा) मुख्य कार्यालय मुंबई व जिल्हा पोलिस अधीक्षक रत्नागिरी यांनी केलेल्या सूचनेनुसार जलविद्युत प्रकल्पांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यापुढे अभ्यांगतांना पोफळी, कोयना चौथा टप्पा, अलोरे, कोयना धरण पायथा वीजगृह हे प्रकल्प पाहता येणार नाहीत, असे परिपत्रकच मुख्य अभियंता महानिर्मिती पोफळी यांनी काढले आहे. ते संबंधित सर्व प्रकल्प व त्यांच्या कार्यालयांना पाठवून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. 

कोयना धरण सुरक्षेच्या कारणास्तव लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे नेहमीच चर्चेत असते. आता या धरणातील पाण्यावर निर्माण होणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पांवरही सुरक्षेची कुऱ्हाड कोसळली आहे. सह्याद्रीतील डोंगरांच्या खाली कोयना प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर 24 तास कडेकोट सुरक्षा असते. भारतीय अभियंत्याच्या बुद्धिमत्तेचा अविष्कार या जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या रूपाने पाहायला मिळतो.

नव्या पिढीला व प्रामुख्याने तांत्रिक, औद्योगिक क्षेत्रातील मंडळीसाठी अभ्यास, दिशा व दूरदृष्टीसाठी निश्‍चितच असे प्रकल्प मार्गदर्शक ठरतात. आतापर्यंत कोयना धरण आणि सुरक्षा हा नेहमीच ऐरणीवरचा विषय राहिला आहे. कोयना प्रकल्प पाहण्यासाठी पूर्वी पर्यटकांना प्रवेश दिला जात होता. मात्र काही वर्षांपूर्वी मुंबई येथे एका अतिरेक्‍याकडे कोयना धरणाचा नकाशा सापडला म्हणून कोयनेतील बोटिंग बंद करण्यात आले. प्रकल्प पाहण्यासाठी येणाऱ्यांची सर्व माहिती घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार पर्यटकांना प्रवेश दिला जात होता. मात्र देशात अतिरेकी कारवाया वाढल्यामुळे कोयना प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोयना प्रकल्प हे पर्यटनस्थळ नाही. ही राष्ट्रीय संपत्ती आहे. येथे निर्माण होणारी दोन हजार मेगावॉट वीजनिर्मिती बंद झाली तर त्याचा मोठा फटका राष्ट्राला बसेल. अतिरेक्‍यांनी गैरप्रकार घडवून आणला तर प्रकल्पाच्या उभारणीसाठी अब्जावधी रुपयांचा खर्च करावा लागेल. ते शक्‍य नाही. म्हणूनच खबरदारीची उपाययोजना म्हणून हा प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. केवळ वर्धापन दिनाच्या दिवशी स्थानिकांसाठी तो खुला राहील.

- चंद्रशेखर बाबर,

मुख्य अभियंता, महानिर्मिती कंपनी-पोफळी

Web Title: Ratnagiri News Koyna Hydroelectric Project is closed for tourists