कोळंबे - मांडवकरवाडीत भूस्खलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

रत्नागिरी - गेल्यावर्षीपेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे तालुक्‍यात मिरजोळेपाठोपाठ कोळंबे-मांडवकरवाडी येथे भूस्खलन झाले आहे. यामध्ये दोन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेतजमिनीच्या नुकसानासह काही झाडेही उन्मळून गेली आहेत. भात लावणीचे काम सुरू असताना हा प्रकार घडला.  

रत्नागिरी - गेल्यावर्षीपेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे तालुक्‍यात मिरजोळेपाठोपाठ कोळंबे-मांडवकरवाडी येथे भूस्खलन झाले आहे. यामध्ये दोन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेतजमिनीच्या नुकसानासह काही झाडेही उन्मळून गेली आहेत. भात लावणीचे काम सुरू असताना हा प्रकार घडला.  

तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी कोळंबे येथे भेट दिली. तेथे शेतजमीन असून लोकवस्ती भूस्खलन झालेल्या ठिकाणापासून खूपच दूरवर आहे. त्यामुळे लोकवस्तीला कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रत्नागिरी तालुक्‍यात जून महिन्यात १,६९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस रत्नागिरीत असून गतवर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक नोंद झाली आहे. त्यामुळे नदीकिनारी भागातील माती भुसभुशीत झालेली असून भूस्खलनाचे प्रकार घडू लागले आहेत. मिरजोळेपाठोपाठ कोळंबे येथील मांडवकरवाडी येथे शेतजमीन खचली आहे.

भातशेतीचे काम दोनच दिवसांपूर्वी सुरू झाले होते. याच कालावधीत येथे भूस्खलन झाले. हा प्रकार शनिवारी (ता. ३०) सकाळी जमीनमालकांच्या लक्षात आला. त्यांनी ही माहिती तहसील कार्यालयाला दिली.

या भागातील पाच ते सहा गुुंठे भातशेती खचल्यामुळे नुकसान झाले आहे. त्यात चार ते पाच विविध प्रकारची झाडे आहेत. नुकसान झालेल्यांमध्ये जयराम सोनू गावडे, रवींद्र महादेव पाष्टे यांचा समावेश आहे. खचलेल्या भागाचे पंचनामे करण्यात आले आहेत. धोकादायक भागात कोणीही जाऊ नये अशा सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या असून नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्याचे तहसीलदार सुकटे यांनी सांगितले.

दुसऱ्यांदा प्रकार
काही वर्षांपूर्वी मांडवकरवाडीपासून काही अंतरावर असलेल्या वाकीवाडी येथे डोंगराला भेगा गेल्या होत्या. त्यात एका घराचेही नुकसान झाले होते. तो प्रकार थांबल्यानंतर आता मांडवकरवाडीत दुसऱ्यांदा भूस्खलन झाले.

Web Title: Ratnagiri News land slide in Kolambe Mandavkarwadi