लांजा पंचायत समिती आमसभेत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार

रवींद्र साळवी
बुधवार, 11 एप्रिल 2018

लांजा - केंद्रापासून ग्रामपंचायतीपर्यंत तुमची सत्ता असताना तालुक्‍यातील खड्डे बुजविण्यासाठी एक दमडीदेखील आली नाही. महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा करणाऱ्यांनी एकही खड्डा भरला नाही, असा आरोप विरोधकांकडून सुरू असतानाच शिवसेनेच्या शहरप्रमुख व कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलण्यास रोखले. त्यामुळे आमसभेत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

लांजा - केंद्रापासून ग्रामपंचायतीपर्यंत तुमची सत्ता असताना तालुक्‍यातील खड्डे बुजविण्यासाठी एक दमडीदेखील आली नाही. महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा करणाऱ्यांनी एकही खड्डा भरला नाही, असा आरोप विरोधकांकडून सुरू असतानाच शिवसेनेच्या शहरप्रमुख व कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलण्यास रोखले. त्यामुळे आमसभेत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे वातावरण तंग झाले. लांजा पंचायत समितीच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.

तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेध करीत सभात्याग केला व सभागृहाबाहेर जाऊन जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. लांजा तालुका पंचायत समितीची आमसभा मंगळवारी (ता. १०) शहरातील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला सभापती दीपाली दळवी, उपसभापती युगंधरा हांदे, लांजा नगराध्यक्ष सुनील कुरूप, माजी जि. प. अध्यक्ष जगदीश राजापकर, माजी जि. प. बांधकाम सभापती दत्ता कदम, गटविकास अधिकारी सचिन मठपती, नायब तहसीलदार जयप्रकाश कुलकर्णी, जि. प. सदस्य चंद्रकांत मणचेकर, जि. प. सदस्या सौ. स्वरूपा साळवी आदी उपस्थित होते.

सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर मागील सभेच्या ठरावांवर चर्चा सुरू होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आक्रमकतेने भांडत होते. याचा धागा पकडून आमदार राजन साळवी यांनी ‘मला तुम्ही एवढे कंटाळले आहात का, सध्या व्हॉट्‌सॲप आणि वर्तमानपत्रांतून स्थानिक नेतृत्व उदयास येत आहे. म्हणूनच इतक्‍या जोरदारपणे प्रश्न मांडले जात आहेत’, असा प्रश्न उपस्थित केला.  

यानंतर आरगावचे माजी सरपंच बावा खामकर यांनी तालुक्‍यातील रस्ते अतिशय खराब झाले असून त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. यापूर्वीच्या आमसभांमध्ये काँग्रेस आघाडीची सत्ता असल्याने मला निधी मिळत नाही, अशी ओरड आमदार म्हणून आपण करीत होता. मात्र, आता सत्ता तुमचीच असताना निधी आणण्यात तुम्ही कमी पडत आहात का, अशी विचारणा करताच सत्तेमध्ये आम्ही असून नसल्यासारखे असल्याची खंत आमदार साळवी यांनी सभागृहात व्यक्त केली.  
आमसभेत जिल्हा परिषद बांधकामच्या अखत्यारितील रस्त्यांवर चर्चा सुरू असताना विरोधकांनी तुमचे सरकार आल्यापासून पैसा मिळत नसल्याचे सांगतानाच सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्यातच शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांनी प्रश्नकर्ते बब्या हेगिष्टे यांच्याकडून माईक खेचण्याचा प्रयत्न केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला आक्षेप घेतला. ही आमसभा जनतेची आहे की तुमच्या पक्षाची, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. एकमेकांना खेचण्यापर्यंत मजल गेली. अखेर राजन साळवी व्यासपीठ सोडून खाली आले. त्यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. माजी बांधकाम सभापती दत्ता कदम यांनी माईकवरून सभागृह सोडू नका, असे आवाहन केले. मात्र, या आवाहनाला न जुमानता सभागृहातील सर्व कार्यकर्त्यांनी सभागृह सोडून बाहेर जात जोरदार घोषणाबाजी केली. 

आमदारांनी माफी मागणे म्हणजे सभागृहाचा अपमान 

खासदार नारायण राणे यांची राज्यसभेवर निवड झाली. मात्र अभिनंदनाच्या ठरावामध्ये याची दखल घेतली गेली नाही. यावरून श्रीकृष्ण हेगिष्टे, संजय आयरे, मुन्ना खामकर, संजय यादव आदींनी गदारोळ केला. अखेर आमदार राजन साळवी यांनी आपल्या हातून चूक झाली असून आपण यासाठी माफी मागतो असे सांगितले. 
सध्याच्या इतिवृत्तावर बदलून गेलेले गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांचीच सही असल्याचे सभागृहात निदर्शनास आणण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा आमदार साळवी यांनी जाहीर माफी मागताच आमदारांनी माफी मागणे म्हणजे सभागृहाचा अपमान आहे, असे श्रीकृष्ण हेगिष्टे यांनी स्पष्ट केले. 

 

Web Title: Ratnagiri News Lanja Panchayat Samitti General meeting