एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांचे सदस्यत्व रद्द होणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर एलईडी लाईटचा वापर करून मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. एलईडी वापरणाऱ्या नौकांचे मच्छीमारी सोसायटींचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्तांनी दिले आहेत. याची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थांवरही कारवाई केली जाणार आहे.

रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर एलईडी लाईटचा वापर करून मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. एलईडी वापरणाऱ्या नौकांचे मच्छीमारी सोसायटींचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्तांनी दिले आहेत. याची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थांवरही कारवाई केली जाणार आहे.

रात्रीच्या वेळी खोल समुद्रात मासेमारी करताना एलईडी दिव्यांचा वापर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लाईटमुळे आकर्षित होऊन मासे जाळ्यात अलगद सापडतात; मात्र सरसकट मासे जाळ्यात अडकत असल्याने सर्वच प्रकारच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करताना एलईडी लाईटचा वापर करण्यास निर्बंध घालावेत, अशी मागणी मच्छीमार संघटनांनी केली होती.

पूर्वी १२ सागरी मैलापासून पुढे काही अटी आणि शर्तीवर एलईडी मासेमारीला परवानगी होती; मात्र देशभरातील कुठल्याच किनाऱ्यावर एलईडी लाईट्‌सच्या साह्याने मासेमारी करण्यास मज्जाव केला गेला आहे. १० नोव्हेंबर २०१७ ला याबाबतचे एक परिपत्रक केंद्र सरकारने जारी केले होते. मेरीटाईम बोर्ड आणि तटरक्षक दलाला अशा बोटींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

या निर्बंधानंतरही कोकण किनारपट्टीवर एलईडी लाईटच्या साह्याने मासेमारी सुरूच होती. ही बाब लक्षात घेऊन आता अशा मासेमारी नौकांचे सभासदत्व रद्द करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहेत. कायदेशीर कारवाईबरोबरच आता अशा नौकांवर प्रशासकीय कारवाईला सामोर जावे लागणार आहे. ज्या मच्छीमार संस्था एलईडी लाईटचा वापर करतील त्या मच्छीमारांना संरक्षण देतील, त्या मच्छीमार संस्थेला शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या सर्व सवलती बंद करण्याचा निर्णयही मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला आहे.

एलईडी मासेमारी पद्धतीमुळे समुद्रातील माशांचे प्रमाण कमी होईल, त्याचबरोबर संपूर्ण सागरी जैवविविधताच धोक्‍यात येईल अशी भीती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर पूर्वी आढळणाऱ्या अनेक मत्स्य प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एलईडीचा वापर सुरू राहिल्यास आणखी काही मत्स्य प्रजाती कायमच्या नष्ट होऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

जिल्हाधिकारी, सहायक मत्स्य आयुक्‍त, एमएमबी, तटरक्षक दल या सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये एलईडी वापरासंदर्भातील होणाऱ्या निर्णयावर चर्चा केली जाईल. कारवाईबाबतचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत.
- सुलेमान मुल्ला,
मच्छीमार

एलईडीसाठी नौका २५ हजार होल्टेजचा बल्ब वापरून मासेमारी करत असल्‍याने त्‍याचा परिणाम मासेमारीवर होईल.
- रामदास संदे,
उपाध्यक्ष, अखिल भारतीय मच्छीमार संघटना

Web Title: Ratnagiri News LED Fishing issue