वर्चस्वाच्या लढाईत होतोय बिबट्यांचा मृत्यू

वर्चस्वाच्या लढाईत होतोय बिबट्यांचा मृत्यू

रत्नागिरी -  जंगलाच्या नैसर्गिक कायद्यानुसार महत्त्वाचा खुलासा पुढे आला आहे. नर बिबट्याचे जंगलातील क्षेत्र साधारण २ ते ५ किमी असते. या परिस्थितीत ताम्हाणे, उसगाव या ठिकाणी अगदी जवळ-जवळ दोन नर बिबटे सापडले. आपल्या क्षेत्रावर दबदबा ठेवण्यामध्ये हल्ले करून काही नर यशस्वी ठरले; तर काही अपयशी. त्यामुळे जखमी बिबटे, मृतावस्थेत आणि मानवी वस्तीमध्ये बिबटे दिसत आहेत.

बिबट्यांची संख्याच तीन वर्षांमध्ये दुप्पट झाल्याने जंगलातील त्यांचा अधिवास धोक्‍यात आहे. बिबट्यांचे दर्शन होणे आणि हल्ले हा यातीलच प्रकार आहे. या वर्षी सुमारे १० बिबट्यांचा यातून मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

जिल्ह्यात प्रामुख्याने उत्तर विभागात बिबट्यांचे दर्शन, हल्ले आदी प्रकारामध्ये मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी क्वचित एखादा बिबट्याचे दर्शन व्हायचे. आता मात्र ते नित्याचे बनू लागले आहे. एक-दोन दिवसांनी बिबट्यासंदर्भात काही ना काही घटना घडतच आहेत. जिल्ह्यात ब्लॅक पॅंथर वगळता पट्टेरी वाघ कुठेही नाही. जास्तीत जास्त वास्तव्य आहे ते बिबट्यांचे. २०१४ मध्ये साधारण ११० बिबटे होते. गेली तीन वर्षं बिबट्यांनी माणसांवर हल्ला केला, बिबट्या विहिरीत पडला, कोणाच्या गोठ्यातील वासरू पळवले, गाय मारली, असे प्रकार घडत आहेत. जंगलातील नैसर्गिक नियमांवर मोठा आघात झाल्याचे हे संकेत आहेत. त्यात वन विभागही सक्षम नाही. एखाद्या बिबट्याची फासकी किंवा विहिरीतून तत्काळ सुटका झाली असे घडत नाही; मात्र वन विभाग आटोकाट प्रयत्न करतो. अपूर्ण कर्मचारीवर्ग, साधनसामग्रीची कमतरता आदी समस्या या खात्यापुढे आहेत.   

कोणाची तरी एकाची जीत
जंगलाच्या नियमांप्रमाणे एखादा नर बिबट्या सुमारे २ ते ५ किलोमीटरपर्यंत आपली हद्द निश्‍चित करतो. त्यासाठी झाडांवर ठिकठिकाणी ते नख्यांचे किंवा मूत्राचे निशाण सोडतो. त्याच्या हद्दीत दुसऱ्या नर बिबट्याने घुसखोरी केली की त्याला ते सहन नाही. आपल्या क्षेत्रावर आपला दावा दाखवत हल्ला करून तो घुसखोराला हुसकावून लावतो. यामध्ये कोणाची ना कोणाची जीत होते. या लढाईत एकजण पळून जातो किंवा जखमी होऊन जीव तरी गमावतो. काही दिवसांपूर्वीच ताम्हाणे आणि उसगाव येथे लागोपाट दोन बिबटे विहिरीत पडलेले सापडले. पूर्ण वाढ झालेले दोन्ही नर बिबटे २ किमी अंतरातच सापडल्याने वन विभागानेही चिंता व्यक्त केली. बिबट्यांना आपले हक्काचे क्षेत्रच न उरल्याने भक्ष्यासाठी ते कुठेही दिसत आहेत. अगदी मानवी वस्तीमध्ये ते शिरत आहेत. जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. भुकेने व्याकुळ झाल्यावर ते माणसांवरही हल्ले करू पाहत आहेत. बिबट्यांना योग्य अधिवास नाही ही बाब चिंतेची आहे. 

वर्चस्व गाजविण्यातून जखम शक्‍य
राजापूर तालुक्‍यातील मिठगवाणे येथे शनिवारी (ता. २८) सायंकाळी गोठ्यामध्ये एक बिबट्या शिरला. विशेष \म्हणजे गोठ्यात गाय असूनही त्याने हल्ला केला नव्हता. काही वेळानंतर तो मृत पावला. या बिबट्याच्या पुढच्या पायाला मोठी जखम होती. गॅंगरिंग होऊन तो पाय निकामी 
झाला होता. त्यामुळे त्याला शिकार करता येत नव्हती. भुकेमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा वन विभागाचा अंदाज आहे. त्याच्या पायाची जखम ही जंगलातील क्षेत्र निश्‍चित करण्यासाठी आपापसांत झालेल्या हल्ल्यातून झाली असावी, असा संशय वन विभागाचा आहे. 

जिल्ह्यात  ६२.५९ चौ. कि. वनक्षेत्र
जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ८२४८.८ चौ.किमी आहे. त्यामध्ये अवघे ६२.५९ चौ. किमी एवढेच वनक्षेत्र आहे. जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रामध्ये ०.८ टक्के एवढेच वनक्षेत्र आहे. वनक्षेत्राच्या तुलनेमध्ये हा जिल्हा राज्यात २२ व्या क्रमांकावर आहे. हे क्षेत्र राज्याच्या ३.७ टक्के आहे. जिल्ह्यात एकूण १५१९ खेडी असून त्यापैकी १५१५ वसलेली व ४ ओसाड आहेत. जिल्ह्याला लागूनच कोयना व चांदोली अभयारण्य आहे. त्यामध्ये खेड, चिपळूण, संगमेश्‍वर तालुक्‍यांचा समावेश आहे. वन क्षेत्रामध्ये वाढ झाली असल्याची शक्‍यताही फारच कमी आहे.

बिबटे २ ते ५ किलोमीटरचे जंगली क्षेत्र निश्‍चित करतात. त्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या बिबट्याला शिरू देत नाहीत. ताम्हाणे आणि उसगाव येथील २ किमी अंतरावर आम्हाला दोन नर बिबटे सापडल्यावर धक्का बसला. एवढ्या कमी अंतरामध्ये दोन नर बिबटे राहू शकत नाहीत. यावरून बिबट्यांची संख्या प्रचंड वाढल्याचा आमचा अंदाज आहे. त्यामुळेच हल्ले, दर्शन, बिबट्यांचा मृत्यू असे प्रकार घडत आहेत. 
- बी. आर. पाटील, 
   रत्नागिरी विभागीय वनअधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com