पशुधन पर्यवेक्षकाची शिपायाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

रत्नागिरी - विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या जिल्हा परिषदेत आज दुपारी फ्री स्टाईल मारहाणही पाहायला मिळाली. दरवाजातून बाहेर जाताना धक्‍का बसल्यावरून पशुधन पर्यवेक्षकाने एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

रत्नागिरी - विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या जिल्हा परिषदेत आज दुपारी फ्री स्टाईल मारहाणही पाहायला मिळाली. दरवाजातून बाहेर जाताना धक्‍का बसल्यावरून पशुधन पर्यवेक्षकाने एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

जखमी कर्मचाऱ्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला हृदयविकार असून, बायपास शस्त्रक्रियेची सूचना केली होती. दरम्यान, या प्रकाराचा निषेध करत चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

मारहाणीत सूर्यकांत सखाराम चव्हाण जखमी झाले. ते द्रुणोपचारक म्हणून जिल्हा परिषद पशू विभागात काम करतात. यासंदर्भात कायदेशीर कारवाईबाबत सायंकाळी उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती. जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर चव्हाण यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. 

कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चव्हाण दुपारी कामासाठी बाहेर निघाले होते. त्याचवेळी पशुधन पर्यवेक्षक सुदाम विष्णू तोरसकर यांना त्यांचा धक्‍का लागला. यावरून तोरसकरांनी चव्हाणांच्या कानशिलात लगावली. त्यांच्यावर धावून जात मारहाण केली. चव्हाण यांना सोडविण्यासाठी कर्मचारी धावले. मार सहन न झाल्याने चव्हाण खाली कोसळले. त्यांना पाणीही पाजण्यात आले. त्यांना हृदयविकार असून, बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता. अशा स्थितीत हा प्रकार घडल्याने ते हादरले होते. 

ही घटना समजल्यानंतर सर्वच कर्मचारी पशू विभागाकडे धावले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सावंत, पशुधन विकास अधिकारी माळी तेथे पोचले. चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे कर्मचारीही तेथे आले. जखमी चव्हाण यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची भेट घेतली आणि पशुधन पर्यवेक्षक तोरसकर यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

एखाद्या अधिकाऱ्याकडून अशी मारहाण झाल्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीमध्ये याची नोंद झाली आहे. सीईओ मिश्रा यांनीही पशुधन विकास अधिकारी माळी यांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत.

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अशी वागणूक मिळणे योग्य नाही. असा प्रकार पुन्हा घडणार नाही, यासाठी तोरसकर यांच्यावर कडक कारवाई व्हावी.
- एस. आर. जोशी,
संघटना पदाधिकारी

Web Title: Ratnagiri News livestock supervisor assaulted the peon