खेडकुळी येथे माघी गणेशोत्सवाची पारंपरिक पद्धतीने सांगता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

रत्नागिरी - तालुक्‍यातील चिंद्रवली येथील खेडकुळी येथे श्री गणेश मंदिरात सोमवारी पहाटे माघी गणेशोत्सवाची पारंपरिक पद्धतीने सांगता झाली. नवसाला पावणारा गणेश म्हणून या मंदिराची ख्याती आहे. भाविकांनी सुमारे १०० गुळाच्या ढेपा श्रींना अर्पण केल्या. आवर्तने, कीर्तन, आरत्या, भोवत्यांच्या पारंपरिक वातावरणात या उत्सवाची सांगता झाली.

रत्नागिरी - तालुक्‍यातील चिंद्रवली येथील खेडकुळी येथे श्री गणेश मंदिरात सोमवारी पहाटे माघी गणेशोत्सवाची पारंपरिक पद्धतीने सांगता झाली. नवसाला पावणारा गणेश म्हणून या मंदिराची ख्याती आहे. भाविकांनी सुमारे १०० गुळाच्या ढेपा श्रींना अर्पण केल्या. आवर्तने, कीर्तन, आरत्या, भोवत्यांच्या पारंपरिक वातावरणात या उत्सवाची सांगता झाली.

सुमारे ३०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या मंदिरात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी शोभा वाढली. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. श्री. बालाजी तांबे हे मुळचे खेडकुळीचे. डॉ. श्री तांबे गुरुजी यांच्यासमवेत कुटुंबीयसुद्धा या उत्सवासाठी खास आले आहेत.

या ठिकाणी गणपती पावतो म्हणजे सांगितलेली गोष्ट गणपती सिद्धीस नेतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे विविध ठिकाणांहून लोक उत्सवाला आले होते. कौटुंबिक, आर्थिक व अन्य विविध समस्यांवर मात करण्यासाठी सुमारे १०० जणांनी नवस बोलला होता. तो पूर्ण झाल्याने त्यांनी गुळाच्या ढेपा श्रीचरणी अर्पण केल्या. त्यानंतर तो समस्त भाविकांमध्येच प्रसाद म्हणून वाटण्यात आला. पारंपरिक पावित्र्य राखून सांस्कृतिक पद्धतीने पूजा-अर्चा, आरती, गाणी, भोवत्यांनी उत्सवात रंग आणला. फेर धरून म्हटलेल्या भजनांवर साऱ्यांनी ठेका धरला. चिंद्रवली पंचक्रोशीसह रत्नागिरी, पुणे-मुंबईपासूनची मंडळी अनेक भाविक उत्सवात सहभागी झाले. उत्सव काळात श्रींवर गुळाचा अभिषेक करण्यात आला. प्रसिद्ध विश्‍वनाथबुुवा भाटे यांच्या लळिताच्या किर्तनाने उत्सवाची सांगता झाली.

तात्या मास्तरांचा सत्कार
डॉ. श्री. तांबे गुरुजी यांचे काका तात्या मास्तर यांचा सत्कार भाविकांच्या वतीने तांबे गुरुजी यांनी केला. गतवर्षी त्यांनी वयाची १०० वर्षे पूर्ण झाली. त्यांनी अखंडित ६० वर्षे श्री गणेशाची सेवा केली. सत्काराला उत्तर देताना तात्या मास्तरांनी सांगितले की, फक्त तांबे परिवार नव्हे, तर अनेक भाविकांच्या योगदानातून प्रतिकूल परिस्थितीतही उत्सव चालू ठेवला. मी कार्यकर्ता म्हणून काम केले. त्याचप्रकारे सर्व भाविकांनी खांद्यावर घेऊन ही प्रथा, परंपरा चालू ठेवावी. ही प्रथा अखंडित चालू ठेवण्याची ग्वाही डॉ. श्री. बालाजी तांबे यांनी समस्त भाविकांच्या वतीने दिली.

Web Title: Ratnagiri News Maghi Ganeshushav in Khedkuli