वडापावची गाडी ते सुवर्णपदक...

मुझफ्फर खान
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

चिपळूण - मंगोलिया येथील ‘मिस्टर वर्ल्ड २०१७’  बॉडी बिल्डिंग स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महेंद्र चव्हाणने खडतर प्रयत्नातून यश संपादन केले. वडापावच्या गाडीवर काम करून त्याने आयुष्याची सुरवात केली. कधी कपबशी धुतली, कधी फरशीही पुसली. वेळप्रसंगी उपाशी राहिला. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. 

चिपळूण - मंगोलिया येथील ‘मिस्टर वर्ल्ड २०१७’  बॉडी बिल्डिंग स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महेंद्र चव्हाणने खडतर प्रयत्नातून यश संपादन केले. वडापावच्या गाडीवर काम करून त्याने आयुष्याची सुरवात केली. कधी कपबशी धुतली, कधी फरशीही पुसली. वेळप्रसंगी उपाशी राहिला. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. 

महेंद्र १९९८ पासून बॉडी बिल्डिंगसाठी मेहनत घेत आहे. घरची परिस्थिती बिकट. वडील मनोहर चव्हाण दोन्ही पायांनी अपंग. शेतीतूनच कुटूंबाचा उदरनिर्वाह होतो. तरीही महेंद्रचे बॉडी बिल्डरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे गाठले. तेथे वडापावच्या गाडीवर काम केले. कप-बशी धुतली, फरशी फुसली. हे करत असतानाच पुण्यातील व्यायामशाळेत प्रवेश घेतला. त्याला कुणाल नावाच्या मित्राने आर्थिक मदतही केली.
तेथून छोट्या स्पर्धेत भाग घेण्यास सुरवात महेंद्रने केली. केवळ पुण्यात त्याने २०० हून अधिक चॅंपियन ट्रॉफी मिळवल्या. चारवेळा राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. २०१७ मध्ये त्याला रनरअपचे २ वेळा मानांकन मिळाले. ‘भारत श्री’मध्ये २ वेळा गोल्ड आणि एकदा सिल्व्हर मिळवले. २०१७ च्या ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत तो उपविजेता ठरला. इंडिया फेडरेशनतर्फे यंदा झालेल्या स्पर्धेत त्याने सुवर्ण पटकावले. त्यानंतर मंगोलिया येथे झालेल्या ‘मिस्टर वर्ल्ड २०१७’ मध्ये सुवर्णपदक मिळवित त्याने आपले स्वप्न साकार केले.

ज्यावेळी मी स्पर्धा जिंकेन त्यावेळी दुसऱ्या देशात माझ्या राष्ट्रगीताची धून वाजेल आणि मी सलामी देईन. माझे ते स्वप्न मंगोलिया येथे पूर्ण झाले. राष्ट्रगीताची धून वाजू लागली, त्यावेळी माझा ऊर भरून आला. पुण्यामध्ये मी चांगल्या क्‍लबमध्ये काम करीत असून स्वतःची जिम सुरू करणार आहे. लवकरच एका मराठी चित्रपटात काम करणार आहे. चिपळुणात अत्याधुनिक व्यायामशाळा सुरू करण्याचा मानस आहे. 
- महेंद्र चव्हाण

मायभूमीतील सत्काराने भारावलाे : महेंद्र

सुवर्णपदकविजेत्या महेंद्र चव्हाण यांचे मायभूमी चिपळूणमध्ये जोरदार स्वागत झाले. सामाजिक कार्यकर्ते मयूर खेतले व त्यांच्या साथीदारांनी हे स्वागत केले. बहादूरशेख नाका येथून मोटार रॅली सुरू झाली. आमदार सदानंद चव्हाण, सभापती पूजा निकम, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर यांनी पुष्पहार घालून त्याचा सत्कार केला. त्यानंतर त्याची मिरवणूक निघाली. 

या दरम्यान महेंद्रचा खेर्डी, पिंपळी, अलोरे येथील ग्रामस्थांनी सत्कार केला. कुंभार्ली येथील महाकाली मंदिरमध्ये देवीचे दर्शन घेतल्यानंतर तीन गाव कमिटीच्या वतीने त्याचा सत्कार झाला. त्यानंतर पोफळी, शिरगाव येथील विविध राजकीय पदाधिकारी, सामाजिक मंडळांचा सत्कार स्विकारून मुंढे या जन्मगावी त्याचे जंगी स्वागत झाले. तळसर माझे गाव, तर शिरगाव आजोळ या दोन्ही ठिकाणच्या सत्कारामुळे भारावून गेलो, असे महेंद्र चव्हाण याने सांगितले.

Web Title: Ratnagiri news Mahendra Chavan victory in Mister world 2017