मंडणगडातील चार धरणे 'ओव्हरफ्लो'; दिवसभरात ११४ मिमी पाऊस

सचिन माळी
मंगळवार, 18 जुलै 2017

पावसाची कोसळधार; घरांना फटका; धबधबे पर्यटकांचे आकर्षण

मंडणगड : तालुक्यात दमदार पाऊस सुरु असून चिंचाळी, तुळशी, भोळवली, पणदेरी ही मध्यम व लघु आकाराची धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तालुक्यात पावसाची कोसळधार सुरु असून आत्तापर्यंत १६८१ मिमी पाऊस पडला आहे. मंगळवारी ता:१८ रोजी ११४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचा फटका घरांना व जनावरांना बसला आहे. आजपर्यंत तालुक्यात सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मंडणगड तालुक्‍यात १९७९ साली चिंचाळी हे पहिले धरण बांधण्याची सुरवात झाली. ३८ वर्षानंतरही तांत्रिक दोषांमुळे ते आजही पूर्ण झालेले नाही. चिंचाळी धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता २.१४ दशलक्ष घनमीटर आहे. हे धरण सर्वांत आधी भरत असून गळतीमुळे मात्र पावसाळा संपल्यानंतर झपाट्याने याच्या पाणीसाठ्यात घट होते. तर भोळवली धरण ६.९१, तुळशी धरण १.९६७, पंदेरी धरण ४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. मात्र या धरणांचे कालवे अपूर्ण अवस्थेत असून मुजण्याची स्थितीत आहेत. तिडे येथील धरणाचे काम सुरू आहे.

महत्त्वाकांक्षी व पूर्ण झालेल्या चार धरणांच्या जलसाठ्याच्या माध्यमातून तालुक्‍यातील ७४६ हेक्‍टर जमीन ओलिताखाली येऊन शेतीकरिता पाण्याचा वापर केला जाणे अपेक्षित आहे. पावसाच्या कोसळधारेने नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. कडीकपऱ्यातील धबधबे सक्रिय झाल्याने पर्यटकांसह स्थानिकही धबधब्याचा पाण्यात भिजून यथेच्छ आनंद लुटत आहेत. केळवत, तुळशी, पालवणी, चिंचाळी, उमरोली, घोसाळे, पणदेरी घाटात रस्त्यांशेजारुन सक्रीय झालेले अनेक लहानमोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याचबरोबर धरण परिसरातील दूरवर पसरलेले पाणी पर्यटकांचे आकर्षण वाढवत आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: ratnagiri news mandangad dams overflow rains