भारजा नदीचे पाणी पुन्हा चिंचघर- मांदिवली पुलावरून

सचिन माळी
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

वाहतूक ठप्प; शेती पाण्यात; कुंबळे येथील पूल पाण्याखाली

मंडणगड : तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून सतत तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून तालुक्यातील भारजा, निवळी नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्या आहेत. भारजा नदीचे पाणी पुन्हा एकदा चिंचघर पुलावरून वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे. तिडे तळेघर गावांना जोडणारा कुंबळे येथील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला.

गेल्या तीन दिवसांपासून मंडणगड तालुक्याला अक्षरशः पावसाने गारठवून टाकले आहे. या पावसामुळे नद्या, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. भारजा व निवळी नद्यांच्या पुराचे पाणी लगतच्या शेतात घुसल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. परिणामी हाताशी आलेले पीक नुकसान होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेने ग्रासले आहेत. येणारे पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे मंडणगड दापोली मार्गावरील चिंचघर व मंदिवलीला जोडणाऱ्या पुलावरून भारजा नदीचे पाणी सकाळी अकरा वाजल्यानंतर वाहू लागले.

अद्यापही रस्ता पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहुतक बंद आहे. तसेच या पुलाला दोन्ही बाजूला रेलिंग नसल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडील गाड्या चिंचघर व मांदीवली गावात थांबवण्यात आल्या. गावांचा संपर्क तुटल्याने परिसरातील नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल झाले. मात्र सुदैवाने तालुक्यात अद्याप तरी जीवितहानी झालेली नाही.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: ratnagiri news mandangad rains bharja river overflow

टॅग्स