आंबा निर्यातीचे प्रमाणीकरण आता रत्नागिरीतही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

रत्नागिरी -  रत्नागिरीतील आंबा निर्यात सुविधा केंद्राला अपेडाचे प्रमाणीकरण मिळालेले नसल्याने आतापर्यंत परदेशी निर्यातीसाठी वाशीवर अवलंबून राहावे लागत होते; मात्र प्रमाणीकरण झाल्यामुळे युरोपला थेट या पॅकहाऊसमधून आंबा पाठविणे शक्‍य होणार आहे.

रत्नागिरी -  रत्नागिरीतील आंबा निर्यात सुविधा केंद्राला अपेडाचे प्रमाणीकरण मिळालेले नसल्याने आतापर्यंत परदेशी निर्यातीसाठी वाशीवर अवलंबून राहावे लागत होते; मात्र प्रमाणीकरण झाल्यामुळे युरोपला थेट या पॅकहाऊसमधून आंबा पाठविणे शक्‍य होणार आहे. तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलियातील निर्यातीसाठीच्या प्राथमिक प्रक्रियाही येथेच होणार आहेत. सोमवारी (ता. १६) अपेडाच्या पथकाने या केंद्राला हिरवा कंदील दिल्यामुळे हापूसचा रत्नागिरीतून थेट परदेशी प्रवास सुकर झाला आहे.

राज्य कृषी पणन मंडळातर्फे उभारलेल्या हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्राच्या प्रमाणीकरणासाठी नॅशनल प्लॅंट प्रोटेक्‍शन ऑर्गनायझेशन (नवी दिल्ली), ॲग्रीकल्चर अँड प्रोसेस फूड व प्रॉडक्‍टस्‌ एक्‍स्पोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (अपेडा) आणि कृषी व सहकार विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी रत्नागिरी आंबा निर्यात केंद्राची तपासणी केली. पथकात आर. के. शर्मा, योगेश पांडे, लोकेश गौतम, श्री. धिंग्रा, पणनचे डॉ. भास्कर पाटील, मिलिंद जोशी होते. रत्नागिरीतील ही सुविधा सद्‌गुरू एंटरप्रायजेस्‌ यांच्यामार्फत चालविली जात आहे.

जुन्याच निकषाचा वापर 
उष्णजल प्रक्रियेसाठी ४८ अंश सेल्सिअसला ६० मिनिटे आंबा ठेवणे आवश्‍यक आहे. ही प्रक्रिया केल्यानंतर आंबा पोळून त्यात साका होण्याची भीती काही बागायतदारांनी व्यक्‍त केली होती. त्यानुसार कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून अहवाल अपेडाकडे पाठविला. त्यात ४७ अंश सेल्सिअसला ५० मिनिटे आंब्यावर प्रक्रिया करावी, अशी सूचना केली होती. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या केंद्रातून जुन्याच निकषाचा वापर केला जाणार आहे.

दोन वर्षे रत्नागिरीतील या निर्यात केंद्रातून आंबा परदेशात गेला नव्हता. वॉशिंग आणि प्री-कुलिंगची सुविधा येथे उपलब्ध आहे. तसेच रत्नागिरीतून थेट युरोपला आंबा पाठविण्यासाठी उष्णजलची यंत्रणाही येथे आहे; परंतु आंबा बागायतदारांनी याचा लाभ घेतला नव्हता. यावर्षी आंब्याचे उत्पादन कमी असले तरीही २० मार्चपासून युरोपसह अमेरिकेला वाशीतून आंबा निर्यात सुरू झाली आहे.

Web Title: Ratnagiri News Mango export certification now in Ratnagiri