समृद्ध मराठी परंपरा मांडली "मराठीनामा'मधून 

मकरंद पटवर्धन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - समृद्ध मराठी भाषा, त्यातील गीते, कविता, उतारे, नाटकातील प्रसंगांचे अभिवाचन, दृकश्राव्य माध्यमातून पुरस्कार विजेत्यांचे मनोगत, पारंपरिक नृत्य अशा अत्यंत सुरेख वातावरणात मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे मराठीनामा कार्यक्रम झाला.

रत्नागिरी - समृद्ध मराठी भाषा, त्यातील गीते, कविता, उतारे, नाटकातील प्रसंगांचे अभिवाचन, दृकश्राव्य माध्यमातून पुरस्कार विजेत्यांचे मनोगत, पारंपरिक नृत्य अशा अत्यंत सुरेख वातावरणात मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे मराठीनामा कार्यक्रम झाला.

रसिक प्रेक्षकांच्या प्रतिसादात कार्यक्रम सुमारे साडेतीन तास रंगला. खातू नाट्यमंदिरात काल (ता. 27) रात्री याचे आयोजन केले होते. माधव विद्यालयातील विद्यार्थ्यांनी माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा या गीतावर सुरेख नृत्य सादर केले. मोरोपंतांची आर्या, संत साहित्यातील अभंग, भारूड, पोवाडा, संत, तंत आणि पंत साहित्याचे यथार्थ दर्शन या कार्यक्रमातून झाले. 

आणखी व्हिडिआे पाहण्यासाठी क्लिक करा 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आनंद भाटे यांनी कार्यक्रमाची उंची वाढवली. नमन नटवरा, अवघाची संसार, वद जाऊ कुणाला शरण, चिन्मया सकल हृदया या गीतांना श्रोत्यांनी विशेष पसंती दिली. त्यांच्या जोडीला गायक सौरभ वखारे यांनीही सुरेख गायन केले. मधुरा कुंभार यांनी मोगरा फुलला, दळिता कांडिता, नेसली पितांबर जरी, मराठी असे आमुची मायबोली ही गीते छान म्हटली. सिद्धेश जाधव यानी प्रतापगडचा पोवाडा वीररसपूर्ण सादर करून सर्वांची वाहवा मिळवली.

दादला नको गं बाई आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मैना गावाकडे राहिली हे गीतही त्यांनी सुरेख म्हटले. नाटकांची समृद्ध परंपरा, कवींची परंपरा मांडण्याचा चांगला प्रयत्न

कार्यक्रमातून दिसला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनादि अनंत मी म्हणताना मराठी समृद्ध करायला सावरकरांनी रचलेले शेकडो शब्द सांगितल्यावर रसिकांच्या टाळ्या मिळाल्या. 

प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले, लेखक, अभिनेते संदेश कुलकर्णी, अभिनेते शैलेश दातार यांनी विविध उताऱ्यांचे यथार्थ अभिवाचन करून कार्यक्रमात जान आणली. केशवसुत, माधव ज्युलियन, नारायण सुर्वे यांच्या कवितांसह एकच प्याला, द्रौपदी, दया पवारांचं बलुतं, नामदेव ढसाळांचे गोलपीठा यातील उतारेही वाचले. 

या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची ध्वनीचित्रफीत दाखवली. मराठी भाषा दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कार विजेत्यांची ध्वनीफितही सादर झाली. यात मधुमंगेश कर्णिक, अविनाश बिनीवाले, मराठी विज्ञान परिषद, वरदा प्रकाशन आदींचा समावेश होता. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश कांबळे, व्यवस्थापन समिती सदस्य दीपक मुकादम, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालक रमा भोसले, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष तथा सिनेट सदस्य शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, गायक आनंद भाटे, मराठी अस्मिता सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सूत्रधार मंदार गोगटे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, मुंबई विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. लीलाधर बनसोड, विद्यापीठ उपकेंद्र समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई उपस्थित होते.

या साऱ्यांना पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. 
या वेळी दिनेश कांबळे यांनी मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन करत प्रशासनात मराठीचा अधिक वापर केला जातो असे सांगितले. महानगरांमध्ये मराठीच्या स्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मात्र मराठी ही ज्ञानभाषा होण्याकरिता विद्यापीठ आपापल्या पातळीवर प्रयत्नशील असल्याचे मतही मांडले. 

रमा भोसले यांनी मराठी भाषा जीवंत ठेवण्यासाठी साऱ्यांचे योगदान आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त केले. मातृभाषा ब्रह्मविद्या आहे त्यामुळे तिला सन्मान दिला पाहिजे. भाषेने आपल्याला मोठे केले त्यामुळे तिच्याबद्दल आदर राखला पाहिजे. या कार्यक्रमातून मराठीचा गोडवा असाच राहू दे व साहित्याची गोडी वाढू दे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. 

कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती, दिग्दर्शन संगीतकार कौशल इनामदार यांची होती. तबला हेरंब जोगळेकर, ढोलकी हृषिकेश देशमाने, हॅंडसॉनिक मंदार गोगटे, गिटार संजय महाडिक, हार्मोनिअम अमित पाध्ये, कीबोर्ड सत्यजित प्रभू यांची सुरेख संगीतसाथ लाभली. अस्मिता पांडे यांनी अभ्यासपूर्ण व ओघवत्या भाषेत निवेदन केले. अभिजित भट व सहकलाकारांनी कोरससाथ केली. 

Web Title: Ratnagiri News Marathinama Marathi Rajbhasah Day