वेगवान मतलई वाऱ्यांचा मच्छीमारीला अडथळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

रत्नागिरी -  कोकण किनारपट्टीवर बुधवारी (ता. २१) सायंकाळपासून अचानक सुटलेल्या वेगवान मतलई वाऱ्यांनी मच्छीमारांची वाट अडविली आहे. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांनी जवळच्या बंदरांचा आधार घेतला. मिरकरवाडा, भगवतीबंदर येथील सुरक्षित किनाऱ्यांवर कोकणासह मुंबई, गुजरात, कर्नाटकातील सातशे नौका आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.

रत्नागिरी -  कोकण किनारपट्टीवर बुधवारी (ता. २१) सायंकाळपासून अचानक सुटलेल्या वेगवान मतलई वाऱ्यांनी मच्छीमारांची वाट अडविली आहे. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांनी जवळच्या बंदरांचा आधार घेतला. मिरकरवाडा, भगवतीबंदर येथील सुरक्षित किनाऱ्यांवर कोकणासह मुंबई, गुजरात, कर्नाटकातील सातशे नौका आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.

यावर्षीचा मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर वारंवार हवामानातील बदलांना सामोरे जावे लागत आहे. बुधवारी (ता. २१) सायंकाळपासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे परिणाम कोकण किनारपट्टीवरही दिसू लागले आहेत. वारे वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या मच्छीमारांची तारांबळ उडाली आहे. नौका उभ्या करून ठेवणे पसंत केले. अनेक मच्छीमारांनी समुद्रात पाठवलेल्या नौका माघारी बोलावल्या.

यापुर्वीच्या ओखी वादळामुळे सागरी प्रवाह बदलले असून त्याचा प्रवाळ आणि जैवविविधतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मत्स्योत्पादनात घट दिसते. समुद्राचे पाणी खवळले की मच्छी खोलवर जाते. वातावरण शांत होईपर्यंत मासळी मिळणे दुरापास्त असते. तसेच वादळी स्थितीमुळे पाण्यालाही प्रचंड करंट असतो. त्यात नौका उभ्या राहणे अशक्‍य आहे. त्यास्थितीत मासेमारी करताना नौका बुडण्याची भिती नाकारता येत नाही. वातावरण बदलले की मच्छीमारही सुरक्षित बंदरांचा आधार घेतात.

गुरुवारी (ता. २२) दिवसभर वाऱ्यांचा वेग कायम होता. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाण्यापेक्षा नौका उभ्या करुन ठेवणे पसंत केले आहे. कोकण पट्ट्यातील सुरक्षित बंदर म्हणून मिरकरवाडा, भगवतीबंदर, जयगड, काळबादेवी, पावस यासह जिल्ह्यातील प्रमुख बंदरांवर मासेमारी नौकांनी आश्रयासाठी गर्दी केली होती. भगवतीबंदर जेटीजवळ परराज्यातील नौकाही दाखल झालेल्या आहेत. गेले काही दिवस बदलत्या वातावरणामुळे मासळी गायब झाली होती.

सध्या मच्छिमारांना तार्ली आणि बांगडी यावर समाधान मानावे लागत आहे. हा वारा किती दिवस राहणार यावरच मच्छीमारांचे भवितव्य अवलंबून आहे. हंगामाच्या सुरूवातीपासून बांगडा, सुरमई बंपर मिळत होते. त्यातून लाखो रुपयांचा व्यवसाय करता आला होता. आता वातावरण निवळण्याची प्रतीक्षा मच्छीमारांना करावी लागणार आहे. बंदरात दाखल झालेल्या मासेमारी नौकांना लागणारे पाणी किंवा अन्न स्थानिक मच्छीमारांकडून पुरविले जात आहे.

बिघडलेल्या वातावरणाचा फटका उत्पादनाला बसला आहे. वारंवार हे होत असल्यामुळे यावर्षी उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.
- पुष्कर भूते,
मच्छीमार

कमी दरात मासळी
बंदरावर सुरक्षेसाठी आलेल्या अन्य भागातील मासेमारी नौकांनी पकडलेली मासळी स्थानिक मच्छीमारांना विकून टाकली होती. ती खरेदी करण्यासाठी अनेकांनी मिरकरवाडा बंदरावर गर्दी होती. त्या मासळीचे दर कमी असल्याची चर्चा सुरु होती.

Web Title: Ratnagiri News Matalai wind affects fishing