लोकसभेसाठी भाजपची पायाभरणी सुरू

लोकसभेसाठी भाजपची पायाभरणी सुरू

रत्नागिरी - भारतीय जनता पक्षात अन्य पक्षांप्रमाणे घराणेशाही नाही. काँग्रेसमध्ये गांधी घराणे, शिवसेनेत ठाकरे तसेच लालूप्रसाद आणि मुलायमसिंह यादव यांची घराणेशाही चालते. ते स्वतःचे घरदार मोठे करतात; परंतु भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याने तो कार्यकर्त्यांना मोठे करतो, असे सांगत डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी कार्यकर्त्यांना मंत्र दिला. 

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप रत्नागिरी - सिंधुदुर्गात स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे. याची चुणूक मिश्रा यांच्या पहिल्या बैठकीत पाहायला मिळाली. मिश्रा जेथे जातात तेथे विजय निश्‍चित हा अनुभव कार्यकर्त्यांना हुरूप देऊन गेला. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी डॉ. मिश्रा यांच्यावर दिली आहे. आज जिल्हा भाजपच्या कार्यालयात त्यांनी पहिली बैठक घेतली. या वेळी मतदारसंघाचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला.

ते म्हणाले की, ‘‘भाजपला हरवण्याची ताकद कोणामध्ये नाही. संघटन मजबूत करताना ‘आपण जिंकणारच’ अशी मानसिकता ठेवून कामाला लागा. भाजपचे सर्वांत जास्त खासदार, आमदार, महापौर आहेत. असंख्य कार्यकर्ते भाजपचे काम तन, मन, धन अर्पण करून करत आहेत. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युती होती. त्यामुळे सेनेचा जोर आहे.

आपणही सुरुवातीपासून स्वबळावर लढलो असतो तर भाजपची ताकद वाढली असती आणि खासदार म्हणून भाजपचा उमेदवार निवडून आला असता. कुशाभाऊ ठाकरे यांनी मध्य प्रदेशात भाजपचे संघटन मजबूत केले. त्यांनी कार्यकर्त्यांची विजयी मानसिकता तयार केली. त्यामुळे अनेक वर्षे भाजपची सत्ता आहे. आपल्या मानसिकतेवर यश अवलंबून आहे. मेहनत आणि मन लावून काम करा. पक्षसंघटन मजबूत केले पाहिजे. ‘आपण जिंकणारच’ असा ठाम विश्‍वास बाळगून विचार केला पाहिजे.

सद्य:स्थितीत सर्व पक्षांची ताकद कमी होऊ लागली आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मी निवडणूक प्रभारी होतो. त्या वेळी पहिल्या सभेत दोन तृतीयांश सत्ता मिळवायची आहे, असे म्हटल्यावर काही कार्यकर्ते हसू लागले; पण निकालानंतर हेच कार्यकर्ते आनंदित झाले.’’

भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, प्रदेश सदस्य राजन तेली, संघटनमंत्री सतीश धोंड, ॲड. विलास पाटणे, अशोक मयेकर, ॲड. दीपक पटवर्धन, प्रा. नाना शिंदे, नीलम गोंधळी, बाबा परुळेकर, रश्‍मी कदम, जयदेव कदम, सचिन वहाळकर, संदीप लेले, चिपळूण नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, नीलेश भुरवणे, प्रशांत डिंगणकर आदी उपस्थित होते.

मिश्रा जातील येथे भाजपचा विजय
सलग पाच वेळा मंत्रिपद भूषवलेले डॉ. मिश्रा यांच्यावर देशभरातील निवडणुकांची जबाबदारी दिली जाते. ते जिथे जातात तिथे भाजपचा विजय होतो. उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यामुळे कोकणात त्यांची एंट्री भाजपला विजय मिळवून देणार, अशी अटकळ बांधली जात आहे.

बूथ कमिट्या सक्षम करा
पक्षाने दिलेले छोटे छोटे कार्यक्रम करा, त्यातून परिवर्तन होईल, अशी सूचना त्यांनी केली. भारतात ४ लाख विस्तारक भाजपसाठी मेहनत घेत आहेत. बूथ कमिट्या सक्षम करा, त्यातून एकाच वेळी लाखो कार्यकर्त्यांपर्यंत एकाच वेळी निरोप पोहोचतो, असा मंत्रही डॉ. मिश्रा यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com