आंब्यातील लासा, काळा डाग यावर संशोधनाची गरज - वायकर

राजेश कळंबटे
बुधवार, 18 एप्रिल 2018

रत्नागिरी - रत्नागिरी, देवगडमधून लासा किंवा डाग पडलेला, करपलेला आंबा मुंबईत येत आहे. हापूसवर वातावरणाचा परिणाम होत आहे. काळा पडलेल्या फळाला दर मिळत नाही. कोकण कृषी विद्यापीठाने यावर संशोधन करणे गरजेचे आहे., असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.

रत्नागिरी - रत्नागिरी, देवगडमधून लासा किंवा डाग पडलेला, करपलेला आंबा मुंबईत येत आहे. हापूसवर वातावरणाचा परिणाम होत आहे. काळा पडलेल्या फळाला दर मिळत नाही. कोकण कृषी विद्यापीठाने यावर संशोधन करणे गरजेचे आहे., असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.

हातखंबा येथे आंबा विक्री केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. बाजार समितीच्या महामार्गावर आंबा महोत्सव तथा विक्री केंद्राचे उद्‌घाटन पालकमंत्री वायकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, बाजार समिती सभापती मधुकर दळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील २५ बागायतदारांचे स्टॉल आहेत.

वायकर म्हणाले की, कोकणात यावर्षी आंबा कमी आहे. त्यामुळे मुंबईतील  महोत्सव पुढे ढकलला आहे. या महोत्सवात महिला बचत गटांनी सहभागी व्हावे, यासाठी आढावा घेतला; मात्र दोन हजारपैकी अवघ्या पाच गटांनी तयारी दर्शविली. परराज्यात आंबा विक्रीला नेण्यापेक्षा मुंबईच्या कानाकोपऱ्यात आंबा पोचला, तरीही बागायतदारांना फायदा होईल.

सध्या वातावरणामुळे हापूसमध्ये साका होतो किंवा करपतो. काळा पडलेल्या फळाला दर मिळत नाही. कोकण कृषी विद्यापीठाने यावर संशोधन करणे गरजेचे आहे. तसेच बागायतदारांना उपाययोजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेतली पाहिजे.

- रवींद्र वायकर, पालकमंत्री

भाताच्या संशोधित नवनवीन जाती विकसित करण्याबरोबरच आंब्यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी कृषीची आढावा बैठक विद्यापीठात घेण्यात येणार आहे. त्यात आतापर्यंतच्या संशोधनाचा आढावा घेणार. बागायतदारांनी दोनशे कोटी पीक कर्ज घेतले, बाजारातून उचलच झाली नाही, तर उत्पन्न कसे मिळणार? असेही वायकर म्हणाले.

सभापती श्री. दळवी म्हणाले की, बाजार समितीने शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. शेतमाल तारण योजनेत काजू बीवर कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. हातखंबा आंबा महोत्सवात उत्पादक ते थेट ग्राहक अशी संकल्पना राबविली आहे. हा प्रयोग महामार्गावर सात ठिकाणी करणार आहोत.

Web Title: Ratnagiri News Minister Ravindra Waykar comment