बावन्न कोटी खर्चूनही मिरकरवाडा गाळात

बावन्न कोटी खर्चूनही मिरकरवाडा गाळात

मिरकरवाडा बंदर टप्पा २ वर आजमितीस ५२ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा मेरीटाईम बोर्डाने केला आहे; मात्र प्रत्यक्षात बंदरातील गाळाचा प्रश्‍न ‘जैसे थे’च आहे. अंदाजपत्रकातील सगळी कामे पूर्ण करून ३१ मे २०१८ ला बंदर मत्स्य विभागाकडे सुपूर्द करावयाचे आहे. आजच्या घडीला संरक्षक भिंतीव्यतिरिक्‍त अन्य कामांचा आरंभही झालेला नाही. उर्वरित कामे आठ महिन्यांचा कालावधीत पूर्ण होण अशक्‍यप्राय आहे. निधीचा अभाव, नियंत्रण ठेवणाऱ्या खात्यांचे दुर्लक्ष यामुळे मिरकरवाड्यातील मच्छीमारांची उपेक्षाच सुरू आहे. आज  (ता. १८) रत्नागिरी दौऱ्यावर येणारे मत्स्यमंत्री महादेव जानकर मच्छीमारांना दिलासा देणार का?...

बंदराला गाळाचे ग्रहण
नैसर्गिक बंदर असलेल्या मिरकरवाड्याला गाळाचे ग्रहण लागले आहे. हा गाळ काढण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात. २००८ ला तो कायमस्वरूपी काढण्यासाठी सहा कोटी २४ लाख रुपये खर्च झाले. त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’. कोकण किनारपट्टीवरील मिरकरवाडा हे सुरक्षित बंदर असल्याने त्याचा पूर्ण विकास करण्यासाठी शासनाने टप्पा २ साठी ७१ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर केला. त्यानंतर टप्पा २ च्या कामाला सुरवात झाली. ३१ मे २०१८ पर्यंत यातील सगळी कामे पूर्ण करण्याचा कालावधी निश्‍चित करण्यात आला.

५२ कोटींची कामे पूर्णचा दावा...
गाळ बंदरात येऊ नये यासाठी मशिदीजवळील ब्रेकवॉटर वॉल वाढविणे आणि बंदराच्या उत्तरेकडील ६७५ मीटर लांबीची नवीन ब्रेकवॉटर वॉल उभी करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यातील नवीन भिंतीचे काम ५२५ मीटर झाले आहे. मशिदीजवळील भिंतीचे दीडशे मीटर काम पूर्ण आहे. त्यावर ५२ कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. अंदाजपत्रकातील उर्वरित कामे निश्‍चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे शक्‍य नाही. त्यात स्लोपिंग हार्ट (नौका दुरुस्तीसाठी रॅम्प) उभारणे, बंदरावरील अंतर्गत रस्ते, मच्छीमारांसाठी निवारा शेड, उपाहारगृह, मासेमारी साहित्य ठेवण्यासाठी शेडस्‌, सार्वजनिक प्रसाधनगृह यासह चार जेट्यांची दुरुस्ती यांचा समावेश आहे. यामध्येही पाणी मुरत असल्याचा अंदाज मच्छीमारांमधून वर्तविला जात आहे.

 निधीची वानवा अन्‌ कामाचा खोळंबा
बंदराच्या कामाकरिता २०१६-१७ या आर्थिक वर्षात केंद्र शासनाने १० कोटी व राज्य शासनाचे ८ कोटी ९३ लाख असे एकूण १८ कोटी ९३ लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला. त्यापैकी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाला १६ कोटी ४६ लाख रुपये प्राप्त झाले. गेल्या अडीच वर्षांत ७१ कोटीपैकी ३५ कोटी ८४ लाख रुपये शासनाकडून मिळाले आहेत. निधी मिळत नसल्याने उर्वरित काम करण्यास चालढकल सुरू आहे. तीन वर्षांचा कालवधी पूर्ण होण्यासाठी अवघे आठ महिने शिल्लक आहेत. ब्रेकवॉटर वॉलची उर्वरित कामांसह इमारत बांधणी, रस्ते दुरुस्ती, जेटी दुरुस्ती करणे जवळजवळ अशक्‍य आहे.

गाळाची डोकेदुखी कायम
बंदरात गाळ काढण्यासाठी ५२ कोटी खर्च केले तरीही अद्याप बंदर गाळातच आहे. गेल्यावर्षी फ्लोटिंग ड्रेझरने गाळ काढल्यामुळे यावर्षी चॅनलमध्ये कमी गाळ आला. मासेमारी सुरू झाल्यानंतर पावसाळ्यातही चॅनल मोकळे राहिले आहेत. हा नव्याने बांधलेल्या संरक्षक बंधाऱ्याचा फायदा आहे; परंतु मलबारी, डिझेल या दोन जेट्यांमधील गाळ हा मच्छीमारांची डोकेदुखी बनलेला आहे. कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण बंदर अजूनही गाळातच आहेत.

ती संरक्षक भिंत कोसळतेय...
मशिदीजवळील सुमारे ५२० मीटरच्या संरक्षक भिंतीचा डोलारा दरवर्षी लाटांच्या तडाख्याने कोसळत आहे. ती भिंत टप्पा २ मध्ये वाढविण्यात आली आहे; परंतु मागील बाजूच्या दुरुस्तीला निधीच मंजूर झालेला नाही. त्याचे अंदाजपत्रक तयार करून पाठविण्याचे आदेश मत्स्य आयुक्‍तांकडून देण्यात आले आहे. लाटांच्या माऱ्याने ही भिंत कधीही कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी अजून अंदाजे १० कोटींहून अधिक निधीची गरज भासणार आहे. अंदाजपत्रक बनविण्याचे काम एमएमबीकडून सुरू आहे.

मिरकरवाडा बंदरात कामे सुरू झाली आहेत; मात्र त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत; पण मच्छीमारांना अपेक्षित सुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत. स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. रस्ते अद्यापही उभारण्यात आलेले नाहीत. याकडे मत्स्य विभागाने लक्ष केंद्रित केले पाहिजे.
- अाप्पा वांदरकर, मच्छीमार नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com