कोकणच्या गड-किल्ल्यांना जगाच्या नकाशावर स्थान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

रत्नागिरी - कोकणच्या इतिहासाचे साक्षीदार आणि वास्तुकलेचे वैभव असलेले गड आणि जलदुर्ग जगाच्या नकाशावर येणार आहेत. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय "एअरबीएनबी' कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे पर्यटनवाढीबरोबरच स्थानिकांच्या हाताला रोजगार उपलब्ध होणार आहे. यामध्ये कोकणासह राज्यातील 350 हून अधिक गड- किल्ल्यांचा विकास होणार आहे. 

काही मोजके गड, सागरी किल्ले सोडले, तर इतिहासाच्या या ठेव्याकडे गेल्या काही वर्षांत दुर्लक्ष झाले; मात्र महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) हा ठेवा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यासाठी "एअरबीएनबी' कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी गड- किल्ल्यांची ख्याती जगभर पोचवणार आहे. देशाचा इतिहास सांगणारे, हे भांडार जागतिक स्तरावर खुले होईल. एअरबीएनबी कंपनी जगभरातील विविध देशांमधील ऐतिहासिक किल्ले, तसेच महत्त्वाचा ठेवा असलेल्या वास्तू ऑनलाइन पद्धतीने पर्यटकांसाठी उपलब्ध करून देते. स्थानिक प्रशासनाबरोबर करार करून पर्यटनवाढीसाठीही प्रयत्न करते. 

पर्यटनवाढीबरोबरच "बेड आणि ब्रेकफास्ट'द्वारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. स्थानिक रहिवाशांना त्यासाठी "एमटीडीसी'कडे नोंदणी करणे आवश्‍यक आहे. एमटीडीसीशी जोडल्या गेलेल्यांना पहिल्या टप्प्यात "एअरबीएनबी' कंपनी प्रशिक्षण देणार आहे. 

"एअरबीएनबी'चा विस्तार 
पर्यटनक्षेत्रात ऑनलाइन सेवा देणारी एअरबीएनबी कंपनी ऑगस्ट 2008 मध्ये सुरू झाली. अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को व कॅलिफोर्निया शहरातील पर्यटनस्थळांची माहिती ऑनलाइन पद्धतीने जगासाठी खुली करून दिली. आतापर्यंत जगातील 191 देशांतील 34 हजार शहरांतील ऐतिहासिक ठेवा ऑनलाइन पद्धतीने खुला करून दिला आहे. आगामी काळात देशातील गड- सागरी किल्ले व ऐतिहासिक अशा 18 हजार वास्तूंचा ठेवा जगासाठी खुला करून देण्यात येणार आहे. 

Web Title: ratnagiri news MTDC fort konkan