भोंदू बाबांची यादी पोलिसांना देणार - मुक्ता दाभोलकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

रत्नागिरी - अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन झरेवाडीतील पाटील बुवाच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश केला. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील भोंदू बाबांचा सर्व्हे करून त्यांची यादी पोलिस आणि प्रशासनाला देणार. पोलिसांनी सकारात्मक पावले उचलून साक्षीदार उभे करून भगतगिरीविरुद्ध कठोर कारवाई करावी. तसे झाले तर अंधश्रद्धा निर्मूलनमध्ये रत्नागिरी जिल्हा मॉडेल म्हणून देशासमोर येईल. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशामध्ये जादूटोणाविरोधी कायदा लागू करावा, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ॲड. मुक्त दाभोलकर यांनी व्यक्त केले.  

शहरातील केतन मंगल कार्यालयात आयोजित ‘बुवाबाजी विरुद्ध संघर्ष’ सभेत त्या बोलत होत्या. या वेळी ॲड. रंजना गवांदे, राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत, शेखर भुते, ग्रामीण पोलिस निरीक्षक अनिल विभूते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विनोद वायंगणकर, झरेवाडी येथील विलास कोळपे, रूपाली मजगावकर, सिद्धेश मालगुंडकर आदी उपस्थित होते. 

मुक्ता दाभोलकर म्हणाल्या की, ‘‘झरेवाडीतील पाटील बुवाविरुद्ध सर्वांनी मोट बांधली म्हणून त्याची भोंदूगिरी आणि किळसवाण्या प्रकारांना पायबंद घालू शकलो. आता स्वस्थ बसून चालणार नाही. उद्या तो दुसरीकडे आपले दुकान उघडेल. समाजात चांगला संदेश जाण्यासाठी ही बुवाबाजी कायमची बंद करायची आहे.

या सर्व प्रकारामध्ये ग्रामीण पोलिस निरीक्षक अनिल विभूते पुढे आले. त्यांचे खरोखर कौतुक करायला हवे. आतापर्यंत पाटील बुवाकडून होणाऱ्या किळसवाण्या प्रकारांची फक्त चर्चा होत होती; परंतु तक्रार देण्यास कोणी पुढे आले नाही. अंधश्रद्धा निर्मूलन आणि अंनिस व इतर सामाजिक संस्था पुढे आल्यानंतर पीडित महिलेने धाडसाने तक्रार दिली. आता इतर तक्रारदारांनी पुढे यावे; पण पोलिसांनी साक्षीदार शोधण्याची गरज आहे. त्यांना बोलते करून सुरक्षेची हमी दिली पाहिजे. दापोलीमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुली, तरुणींकडून विवस्त्र अवस्थेत पूजा करून घेतली जात होती. त्यासाठी ३ कोटी रुपये देतो, असे सांगून त्यांची फसवणूक होत होती. त्यातील १६ वर्षांची एक पीडित मुलगी पुढे आली आणि या प्रकरणाला पायबंद बसला. पाटील बुवाने मेलेल्या मुलाला जिवंत केल्याचा दावा केला, तर अंध व्यक्तीला दृष्टी देण्याचा. मग अजून इंडियन मेडिकल असोसिएशन गप्प का आहे.? डॉक्‍टरांना समाजात वेगळी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन तक्रार देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

बंद मठात आरोग्य केंद्र, शाळा व्हावी
झरेवाडी येथील बंद पडलेला मठ पुन्हा सुरू होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. या जागेत झरेवाडीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा एखादी शाळा व्हावी, अशी मागणी या समितीतील सदस्यांनी या सभेत व्यक्त केली.  

वेळीच अंकुश घालून बुवाबाजी फोफावणार नाही, यादृष्टीने आम्ही प्रयत्न केला. म्हणून पाटील बुवाला एका गुन्ह्यातून सुटल्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली. जादूटोणाविरोधी कायद्याचा अभ्यास केला. कारवाई करण्याची गरज आहे. त्यासाठी जनजागृतीचे काम तुमचे-आमचे आहे. 
- अनिल विभूते, ग्रामीण पोलिस निरीक्षक.

Web Title: ratnagiri news mukta dabholkar speech