चाैपदरीकरणातील बेकायदा बांधकामांना लाखोंची भरपाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

देवरूख - कशेडी ते हातखंबादरम्यान काही खासगी जागेत जमीनमालकांकडून परवानगी न घेताच बांधकामे उभी करण्यात आली. या बांधकामांचे मोजमाप करून त्यांचे लाखो रुपये अशा बेकायदा बांधकामे करणाऱ्यांना देण्यात आल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आक्षेप जमीनमालकांचा आहे.

देवरूख - कशेडी ते हातखंबादरम्यान काही खासगी जागेत जमीनमालकांकडून परवानगी न घेताच बांधकामे उभी करण्यात आली. या बांधकामांचे मोजमाप करून त्यांचे लाखो रुपये अशा बेकायदा बांधकामे करणाऱ्यांना देण्यात आल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आक्षेप जमीनमालकांचा आहे.

कशेडी ते हातखंबा दरम्यान ज्यांच्या मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करण्यात आले, त्या जमीनमालकांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागून फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. मात्र यासंदर्भात फार विलंब लागत असल्याने जमीनमालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही जमीनमालकांनी केलेल्या फेरसर्वेक्षणाच्या मागणीबाबत निर्णय अजून प्रलंबित असल्याने चौपदरीकरणाचे काम आणखी वर्षभर रखडण्याची भीती व्यक्‍त होत आहे. याबाबत लवकर निकाल न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे.

शासकीय जमिनीवर अतिक्रमणे केलेल्या बांधकामांचा मोबदला प्रशासनाने चुकता केला आहे. तसेच बांधकामाचे असेसमेंट नसतानाही संशयितरीत्या लाखो रुपयांचे वाटप करण्यात आल्याने मोबदला वाटपही संशयाच्या फेऱ्यात सापडले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीचे मोबदला वाटप योग्यरीतीने होत असल्याचा दावा भूसंपादन विभागाने केला असला, तरी प्रत्यक्षात कागदपत्रांची पूर्तता करूनही संगमेश्‍वर तालुक्‍यातील आरवली ते तळेकांटे दरम्यानच्या अनेकांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही.

रखडलेली कामे अधिक
संगमेश्‍वर तालुक्‍यातील शास्त्री पुलाच्या चौपदरीकरणाचे काम ५० टक्‍के पूर्ण झाल्यानंतर ते गेले चार महिने ठप्प आहे. सप्तलिंगी पुलाचे काम सुरू होऊन बंद पडले आहे. बावनदी आणि सोनवी पुलाच्या रुंदीकरणाचा तर पत्ताच नाही. यामुळे केंद्र सरकारला महामार्ग खरंच चौपदरी करायचा आहे की नाही, असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.

आरवली, तुरळ, आंबेड येथील घरे पाडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ज्यांना मोबदला मिळाला आहे, त्यांनी आपली घरे, दुकाने याआधीच खाली केली आहेत. संगमेश्‍वर, माभळेतही मोबदला न मिळताच जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याने नाराजी व्यक्‍त होत आहे. यातच काही भागात मोबदला मूळ मालकांना द्यायचा की बांधकाम केलेल्या मालकांना द्यायचा यावरून गोंधळ सुरू झाला आहे.

महामार्ग चौपदरीकरणात पहिल्यांदा आमची अर्धी जागा संपादित केली होती. त्याचा मोबदला जाहीर झाला; मात्र अद्याप तो आम्हाला मिळालेला नाही. उलट पैसे न मिळताच जागा खाली करण्याच्या नोटिसा मिळाल्या. आता तर आमची पूर्ण जागा संपादित केली आहे. पूर्ण मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही जागा खाली करणार नाही. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले आहे.
-चिंतामणी सप्रे, 
हॉटेल व्यावसायिक, संगमेश्‍वर

Web Title: Ratnagiri News Mumbai-Goa four track highway issue