रत्नागिरी उपकेंद्रातील समस्या सोडवू - प्रभारी कुलगुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

रत्नागिरी -  मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू आहे, त्यात अनेक नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत; परंतु त्याची पूर्तता होत नसल्याचे युवासेनेतर्फे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

रत्नागिरी -  मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू आहे, त्यात अनेक नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत; परंतु त्याची पूर्तता होत नसल्याचे युवासेनेतर्फे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तालुका युवा अधिकारी तुषार साळवी यांच्या नेतृत्वाखाली श्री. शिंदे यांची भेट घेऊन या समस्या सोडविण्याची मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत कुलगुरूंनीही लवकरात लवकर हे प्रश्‍न मार्गी लागतील असे आश्‍वासन दिले.

युवासेनेतर्फे काही दिवसांपूर्वी उपकेंद्रावर धडक मारली होती. विधी महाविद्यालयातील प्रश्‍न सोडविण्यासाठी आंदोलनाचाही इशारा दिला होता. त्यांचा प्रश्‍न सोडविण्यात आल्याची घोषणा मुंबईतील बैठकीत कुलगुरूंनी गुरुवारी (ता. ९) रात्री केली. तरीही युवासेनेतर्फे रत्नागिरीत आंदोलन होणार नाही, याची काळजी पोलिस प्रशासनातर्फे घेण्यात आली होती. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंना निवेदन देऊन येथील समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. त्याला सकारात्मक प्रतिसाद कुलगुरूंनी दिला. त्यामुळे युवासेनेने समाधान व्यक्‍त केले. या वेळी हेमंत खातू, सज्जन लाड, गंधार साळवी, भवानी पिलणकर, मयूरेश भट आणि युवासैनिक उपस्थित होते.

विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सेमिस्टर ५ व ६ चा निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. त्याचा निकाल अद्यापही लागलेला नाही. त्यासाठी भरलेल्या प्रवेश शुल्कांचे एक हजार रुपये पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना घेण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात. ती रक्‍कम उपकेंद्रात मिळेल अशी व्यवस्था करावी. सिंधू स्वाध्याय सर्टिफिकेट अभ्यासक्रम पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते सुरू झाला. त्यानंतर तो बंद पडला. विद्यार्थ्यांनी दिलेले शुल्क अद्यापही परत करण्यात आलेले नाही.

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या रेल्वे रिसर्च सेंटरचा अद्यापही पत्ता नाही. रत्नागिरी येथे ओएसएमअंतर्गत पेपर तपासणी केंद्र सुरू होणार होते. त्यासंदर्भात या उपकेंद्राला ५० संगणक उपलब्ध करून दिले जाणार होते; मात्र ते अद्यापही धूळ खात आहे. विद्यार्थी मदत केंद्र सुरू झालेले नाही. सांस्कृतिक कार्यक्रम बंद पडले आहेत, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांची अतिरिक्‍त पदभारातून मुक्‍तता करावी, अशा मागण्या युवासेनेतर्फे केल्या आहेत.

रत्नागिरी उपकेंद्रातील ढिसाळ कारभाराबाबत युवासेनेतर्फे कुलगुरूंशी चर्चा केली. त्यांनी लवकरात लवकर योग्य निर्णय घेतले जातील असे आश्‍वासन दिले. विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रश्‍न काहीअंशी मार्गी लावल्याने आम्ही समाधानी आहोत.
- तुषार साळवी, तालुका युवा अधिकारी

Web Title: Ratnagiri News Mumbai University sub center problems issue