नाणारमध्ये शिवसेनेकडून निषेधाचे फलक

राजेंद्र बाईत
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

राजापूर - नाणार रिफायनरी प्रकल्पावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रिफायनरीसाठी भूसंपादन करण्याची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा करून काही तासांचा कालावधी उलटताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नसल्याचा खुलासा करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

राजापूर - नाणार रिफायनरी प्रकल्पावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रिफायनरीसाठी भूसंपादन करण्याची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा करून काही तासांचा कालावधी उलटताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नसल्याचा खुलासा करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली असून मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेने निषेध नोंदविला आहे. त्याबाबतचे नाणार परिसरामध्ये ठिकठिकाणी बॅनरही झळकले आहेत.  

नाणार रिफायनरीवरून सेना आधीच बॅकफूटवर होती. या भागामध्ये राजकीयदृष्ट्या सेनेचे वर्चस्व असताना मात्र, रिफायनरीच्या भूसंपादनाची अधिसूचना शिवसेनेचे उद्योगमंत्री श्री. देसाई यांच्या स्वाक्षरीने जारी झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये सेनेबाबत तीव्र नाराजी आहे. प्रकल्पग्रस्तांसह विरोधकांकडून सेनेला टार्गेट केले जात आहे. रिफायनरीवरून होत असलेली ही कोंडी सेनेने नुकतीच फोडण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नुकत्याच झालेल्या प्रकल्पविरोधी सभेमध्ये उद्योगमंत्री देसाई यांनी भूसंपादनचा अध्यादेश रद्द करीत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेने प्रकल्पग्रस्तांची मने जिंकण्यामध्ये काहीअंशी सेनेला यश आले असले तरी, काही तासामध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी असा अध्यादेश रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नसल्याचा खुलासा केला. त्यातून सेनेची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे. त्यातून, सत्ताधारी रिफायनरीवरून एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करत असल्याचे पुढे आले आहे.  सेनेकडून मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. त्याचे पडसाद उमटताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा सेनेकडून निषेध करण्यात आला आहे. त्याचे फलक प्रकल्प परिसरातील गावांमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. 

Web Title: Ratnagiri News Nanar Project and Politics