पडद्यामागील युतीने राणेंची कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

चिपळूण - स्वबळाचा नारा दिलेल्या शिवसेनेने विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग-
रायगड मतदारसंघातून भाजपने माघार घेऊन शिवसेनेचे ॲड. राजीव साबळे यांना पाठिंबा दिला आहे.

चिपळूण - स्वबळाचा नारा दिलेल्या शिवसेनेने विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग-
रायगड मतदारसंघातून भाजपने माघार घेऊन शिवसेनेचे ॲड. राजीव साबळे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांची भूमिका काय असेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. कोकणची जागा स्वाभिमान पक्षाला सोडण्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते. मात्र, अनपेक्षितपणे भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राणे निवडणुकीत तटस्थ राहण्याची शक्‍यता आहे.

विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपबरोबर जागा वाटपाची वाट न बघता शिवसेनेने ॲड. राजीव साबळे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे कोकणात शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्‍यता होती. त्याच दरम्यान कोकणची जागा राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सोडल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले.

शिवसेना-भाजपची युती झाली तर मी भाजपबरोबर नसेन, असे राणेंनी यापूर्वी जाहीर केले होते. राज्यातील सहापैकी प्रत्येकी तीन जागांवर सेना-भाजपचे उमेदवार आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची पडद्यामागून युती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोकणात  भाजप आणि राणेंची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना-भाजपमध्ये कितीही संघर्षाचे वातावरण पेटलेले असले, तरी सत्तेच्या व्यासपीठावर मात्र युती धर्माची पाठराखण केली जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही युती होण्याचे हे संकेत आहेत.
- राकेश शिंदे,

पंचायत समिती सदस्य, शिवसेना, चिपळूण

राणेंची मते निर्णायक
दरम्यान, या निवडणुकीत राणेंची कोंडी करण्यासाठी भाजपने रणनीती आखली असली, तरी निवडणुकीत स्वाभिमान पक्षाची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत राणे ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्‍यता आहे.

 

Web Title: Ratnagiri News Narayan Rane politics