खापणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खोदली श्रमदानातून विहिर

राजेंद्र बाईत
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

कोणतीही दिखावू अथवा तात्पुरते काम न करता विद्यार्थ्यांनी सलग तीन दिवस श्रमदान करून १६ फूट खोल विहीर खोदली. त्याला इतक्‍या कमी खोदाईवर पाणी लागल्याने साऱ्यांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू आले. 

राजापूर - मोबाईल वा व्हॉट्‌सॲपच्या अतिरेकी वापरामध्ये युवा पिढी गुंतली व भरकटली असल्याचा सूर लावला जातो. मात्र, याच युवाशक्तीला विधायक कामात गुंतवता आले. तर त्यातून कायमस्वरूपी काम कसे उभे राहते, याचा आदर्श वस्तुपाठ तालुक्‍यातील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी घालून दिला आहे. कोणतीही दिखावू अथवा तात्पुरते काम न करता विद्यार्थ्यांनी सलग तीन दिवस श्रमदान करून १६ फूट खोल विहीर खोदली. त्याला इतक्‍या कमी खोदाईवर पाणी लागल्याने साऱ्यांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू आले. 

खापणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने वेगळाच मार्ग चोखाळला. विद्यार्थ्यांनी करक-आंबा येथील मांडवकरवाडी येथे सलग तीन दिवस मेहनत केली. श्रमदानाने सोळा फूट खोल विहीर खोदली. या विहिरीला मुबलक पाणी लागले. यामुळे मांडवकरवाडीला मे महिन्यामध्ये भासणारी पाणीटंचाई यावर्षी दूर होणार आहे. प्रकल्पाधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली. सामाजिक बांधिलकीतून युवकांची ऊर्जा कायमस्वरूपी विधायक कामासाठी उपयोगात आणल्याने राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीद प्रत्यक्षात उतरले. 

मांडवकरवाडी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर विहीर खोदण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी जिद्दीने मेहनत घेऊन खोदकाम केले. त्याला यश आले. स्थानिक ग्रामस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या कामातून युवकांची ऊर्जा समाज विकासासाठी उपयोगी पडल्याचे समाधान मिळाले.
- विकास पाटील,
प्रकल्पाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग

पाचल येथील अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या पायथ्याशी करक-आंबा गावातील मांडवकरवाडी वसली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मे महिन्यामध्ये या वाडीला पाणीटंचाईची तीव्र झळ पोचते. पाचल येथील महाविद्यालयाचे शिबिर येथे झाले. मांडवकरवाडीची मे महिन्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काम करण्याचा मानस प्रकल्पाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

येथील वहाळामध्ये पूर्वी खोदाई केलेली विहीर होती. तीच खोदण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सरपंच विजया कोटकर, उपसरपंच सुरेश ऐनारकर, स्थानिक ग्रामस्थांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यश आले. विद्यार्थ्यांनी खोदलेल्या या विहिरीमुळे मांडवकरवाडीला मे महिन्यामध्ये भासणारी पाणीटंचाई काहीअंशी कमी होईल. विहीर बांधणे तसेच कायमस्वरूपी संरक्षण आणि बंदिस्त करण्याची जबाबदारी मांडवकरवाडी ग्रामस्थांनी उचलली आहे. या शिबिर काळात तेथील संघर्षमय आयुष्याबद्दल विद्यार्थ्यांना शिकायला, अनुभवायला मिळाले. विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधलिकीची जाणीव ग्रामस्थांना झाली. 

अन्‌ चेहऱ्यावर फुलले हास्य....
विहीर खोदाईला विद्यार्थ्यांनी सुरवात केल्यानंतर पहिले दोन दिवस तळाशी ओलावा जाणवत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग जमा झाले होते. स्थानिक ग्रामस्थांकडूनही काही आशादायक संकेत मिळत नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून तिसऱ्या दिवशी खोदाईला सुरवात केली. काही फूट खोदाईनंतर तळाशी ओलावा लागला. आणखी खोदल्यानंतर झराही लागला. सर्व विद्यार्थी व त्यांना साह्य करणाऱ्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. काही ग्रामस्थांचे डोळे आनंदाश्रूनी भरले. 
 

Web Title: Ratnagiri News National Youth day special