राष्ट्रवादीचे एल्गार आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

चिपळूण - वाढत्या महागाईविरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी एल्गार आंदोलन करण्यात आले. २५० हून अधिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. जनमत सरकारच्या विरोधात जात आहे.

चिपळूण - वाढत्या महागाईविरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी एल्गार आंदोलन करण्यात आले. २५० हून अधिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. जनमत सरकारच्या विरोधात जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारला विरोध करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्याला प्रतिसाद म्हणून आंदोलन करण्यात आले.

वाढती महागाई, इंधनाचे वाढणारे दर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आदींवर उपाययोजना करण्यात केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता तीन वर्षे आहे. तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आम्ही वेळोवेळी आवाज उठविला.

कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढली; मात्र सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काहीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे तीन वर्षांत पंधरा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले राज्य अशी बदनामी महाराष्ट्राच्या वाट्याला आली. राष्ट्रवादीच्या आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. ही ऐतिहासिक कर्जमाफी असेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले;  

परंतु कर्जमाफीबाबत नियत स्वच्छ नसलेल्या सरकारने शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा केला. ऑनलाईन अर्ज भरण्याची अट घालून लाखो शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवले. अनेक शेतकरी बोगस आहेत, अशी कुचेष्टा केली. भाजपच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. सरकारने १०० टक्के शेतकऱ्यांची कर्ज माफ करून त्यांचा सात-बारा कोरा करावा.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, माजी विरोधी पक्षनेते अशोक कदम, शहरप्रमुख श्रीकृष्ण खेडेकर, क्षेत्रप्रमुख दादा साळवी, महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सौ. चित्रा चव्हाण, माजी नगराध्यक्षा सौ. रिहाना बिजले, युवकचे जिल्हाध्यक्ष राकेश चाळके, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष कमाल बेबल, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य रिया कांबळे, पूनम चव्हाण, जागृती शिंदे आदी उपस्थित होते. पाग येथील कन्या शाळेतून आंदोलनाला सुरवात झाली. प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.

Web Title: ratnagiri news Nationalist congress party protest