लांजा तालुका राष्ट्रवादीचे गटविकास अधिकारी दालनासमोर आंदोलन

रवींद्र साळवी
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

लांजा - काम मंजूर होण्यापूर्वीच व कामाची वर्क आँर्डर निघण्यापूर्वीच कामाच्या अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी महिला कर्मचाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रकार पंचायत समितीमध्ये घडला होता. तसेच तिच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न सत्ताधारी शिवसेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याकडून घडला होता. या घटनेचा निषेध व ठेकेदाराने केलेल्या कामाची चाैकशी व्हावी, यासाठी लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गटविकास अधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पंचायत समितीमध्ये महिला कर्मचाऱ्याशी केलेल्या उद्धट वर्तनाबाबत माहिती घेण्यास गेलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देेेेण्यात आल्याने अखेर राष्ट्रवादीने ठिय्या मांडून आक्रमक पवित्रा घेतला. अखेर अधिकाऱ्यांनी नमते घेउन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

लांजा तालुक्याच्या प्रशासकीय कामांमध्ये एका शासकीय महिला कर्मचाऱ्याला ठेकेदाराकडून अपमानास्पद वागणूक दिल्याची ही पहिलीच घटना असुन या घटनेचा अजित यशवंतराव यांनी खेद व्यक्त केला.  तालुक्यातील कोणत्याही कर्मचाऱ्यावर असा प्रसंग आल्यास आपण त्याच्या पाठीशी राहणार असल्याचे यावेळी सांगितले. लांजा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये कार्यरत असणारी ही शासकीय महिला कर्मचारी मंगळवारी लांजा पंचायत समिती येथे कामानिमित्त आली होती. यावेळी ठेकेदार असणारा शिवसेनेचा पदाधिकारीही त्या ठिकाणी उपस्थित होता. त्या महिला कर्मचाऱ्याला पाहुन आपण काम केलेल्या कामाची रक्कम मिळण्यासाठी तो महिला कर्मचाऱ्याकडे तगादा करु लागला. यामधून पंचायत समिती मध्येच दोघांमध्ये बाचाबाची झाली.

यावेळी शिवसेनेचा ठेकेदार त्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर धाऊन गेल्याने ती महिला कर्मचारी चक्कर येऊन खाली पडली. त्वरीत तेथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तिला लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची राष्ट्रवादी काँग्रेसने व महिला दक्षता कमिटीने दखल घेत त्या महिलेस दिलासा दिला आहे. 

प्रभारी गटविकास अधिकारी संतोष कठाळे व जि. प अभियंता पी. बी. दामले यांच्याशी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली.  या प्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बापू जाधव, उपाध्यक्ष गणेश इंदलकर, संजय खानविलकर, दाजी गडहिरे, जिल्हा महिला प्रतिनिधी आणि तनिष्का आमदार शमा थोडगे, दळवी, अनंत आयरे, बाबा धावणे, समिर तेंडुलकर, सुजित भुर्के, सचिन जाधव, नासिर मुजावर, प्रथमेश काडगाळकर, विकास चव्हाण, सागर खवळे, जितेंद्र खानविलकर, भिकाजी चव्हाण, विघ्नेश गुरव आदी उपस्थित होते.

Web Title: ratnagiri news Nationalist congress party protest