रत्नागिरीतील निवधे ६० वर्षांनंतरही पायाभूत सुविधांपासून दूर

रत्नागिरीतील निवधे ६० वर्षांनंतरही पायाभूत सुविधांपासून दूर

देवरूख - स्वातंत्र्याच्या साठीनंतर डिजिटल इंडिया, कनेक्‍टिंग इंडियाचे ढोल बडवले जात असले तरी ग्रामीण भागातील असंख्य गावांमध्ये पायाभूत सुविधा पोचल्या नसल्याचे विदारक वास्तव आहे. संगमेश्‍वर तालुक्‍यातील निवधे गावातील कोणत्याही वाडीत जाण्यासाठी पक्‍का रस्ताच नसल्याने येथील रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी डोलीचा आधार घेण्याची वेळ येते. 

संगमेश्वर तालुक्‍यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं अतिशय दुर्गम निवधे गावाची लोकसंख्या ७५० आहे. गावात कदमवाडी, चव्हाणवाडी, गुरववाडी, धनगरवाडी, गवळीवाडी, बडेवाडी अशा वाड्या आहेत. १९८४ साली रोजगार हमी योजनेतून या गावात रस्ता झाला. मात्र, त्यावर डांबर कधीच पडलं नाही. त्यामुळे आज ग्रामस्थांना रस्त्याने जायचे असेल तर २० ते २५ कि.मी.चा वळसा घालून आंबा घाटातून कळकदऱ्यातून यावे लागते. 

रस्त्याअभावी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना जंगलातून जावे लागते. गावातील आजारी माणसांचे हाल तर बोलण्यासारखेच नाहीत. कोणत्याही वाडीत व्यक्ती आजारी पडली की त्याला डालग्याची डोली बनवून त्यात बसवायचे. मग नदीचा अडथळा पार करीत ३ कि.मी. पायपीट करून त्याला रुग्णालयात न्यायचे. उपचार झाल्यावर पुन्हा हीच कसरत करीत घरी परतायचे. या कसरतीत अनेकांना इथं जीव गमवावा लागला आहे. याची चाड ना प्रशासनाला ना लोकप्रतिनिधींना.

मुख्यमंत्र्यांकडूनही निराशा
गेली अनेक वर्षे इथले ग्रामस्थ गावात रस्ता व्हावा म्हणून धडपड करत आहेत. रस्ता कुणी करायचा यावरून वाद आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद या दोन्ही यंत्रणा इथं लक्ष देत नाहीत. त्यामुळे अनेकदा इथल्या ग्रामस्थांनी उच्च पातळीपर्यंत मागणी केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तरी आपल्याला न्याय मिळेल, अशा आशेने ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. मात्र पदरी निराशाच पडली. 

आमचे हाल कुत्रा खात नाही अशी स्थिती आहे. गेली अनेक वर्षे हक्‍काच्या रस्त्यासाठी आम्ही धावपळ करीत आहोत. निवडणूका आल्या की आश्‍वासने मिळतात. प्रत्यक्षात काहीच येत नाही. हे आमचे नव्हे तर लोकशाहीचे दुर्दैव आहे.’’ 
- प्रभाकर गुरव, सुवर्णा गुरव,
ग्रामस्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com