रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाला चटकेच

रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाला चटकेच

रत्नागिरी -  धक्कातंत्र वापरून केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला उद्या एक वर्ष पूर्ण होत असताना जिल्ह्यातील मच्छीमारी, आंबा-काजू बागायती आणि बांधकाम या तीन मोठ्या आर्थिक क्षेत्रांना बसलेल्या फटक्‍यातून ही क्षेत्रे अद्याप सावरलेली नाहीत, असा सूर या क्षेत्रातील दिग्गजांनी लावला.

वर्षभर नोटाबंदीचे चटके सोसावे लागले. नर्सरीसारखा उद्योग अजूनही चटके सोसतो आहे. उर्वरित व्यवसाय, छोटे दुकानदार, पर्यटन उद्योग, हॉटेल व्यावसायिक यांना तात्कालिक फटका बसला असला, तरी वर्ष संपेपर्यंत ते यातून बऱ्यापैकी सावरले आहेत. नोटाबंदीबाबत आत्यंतिक बाजूच्या ते तीव्र विरोधाच्या अशा प्रतिक्रिया सामान्यांपासून ते उद्योगपतींपर्यंत साऱ्यांनी दिल्या. वास्तव मात्र या टोकाच्या प्रतिक्रियांच्या मध्येच कुठेतरी आहे. यातील राजकीय अभिनिवेशाचा भाग वगळला, तर शेतकरी, शेतमजूर यांना बसलेला फटका मोठाच होता. जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या मच्छीमारी व आंबा, काजू यांना फटका बसल्याने नोटाबंदीबाबत जिल्ह्यात समाधान कमीच आहे. कॅशलेस व्यवहाराला सुरवात झाली असली, तरी त्यातील अडथळे दूर होण्यास बराच कालावधी जाणार आहे.

नोटाबंदीमुळे आम्हाला मोठा मनस्ताप झाला. वर्कशॉपमधील काम करणाऱ्या नोकर वर्गाला महिन्याचा पगार देतानाही चेकने द्यावा लागला. दुकानातील काही कर्मचाऱ्यांचे बॅंकेत खातेदेखील नव्हते. त्यामुळे त्यांचे खाते उघडूनच चेक टाकणे क्रमप्राप्त होते. दुकानातील मटेरिअलदेखील विकत घेताना समोरचे व्यापारी जुन्या नोटा स्वीकारत नव्हते. त्यामुळे नोटाबंदी फारच त्रासदायक ठरली.
- प्रमोद सुर्वे, व्यावसायिक, मुरडे, खेड

नोटाबंदीच्या निर्णयानंतर दुकानात जुन्याच नोटा ग्राहक घेऊन येत होते. परंतु प्रत्येकाच्या खात्यावर जुन्या नोटा भरण्याची मर्यादा असल्यामुळे जुन्या नोटा स्वीकारणे आम्हाला अडचणीचे वाटत होते. त्यामुळे ग्राहकांना परत पाठवावे लागत होते. जुन्या नोटा बंद झाल्यामुळे काही महिने आमच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला. गेल्या काही महिन्यांत आम्ही पुन्हा उभारी घेत आहोत. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय पचवणे आम्हा छोट्या व्यावसायिकांना थोडे जिकिरीचेच वाटले. 
- विजयानंद गायकवाड, खेड, रत्नागिरी

मोदी सरकारने केलेला नोटाबंदीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. यातून बऱ्याच प्रमाणात झालेली पैशांची अवैध साठवणूक पुढे आली आणि अनेकांचे पितळ उघडे पडले. 
-प्रमोद अधटराव, भाजप तालुकाध्यक्ष 

नोटाबंदीमुळे सुरवातीला थोडा त्रास झाला, पण काही दिवसांनी याचा फायदा समजल्यावर आम्हाला सवय झाली. सरकारने चांगला उपक्रम राबवला.
- संजय शिगवण, शेतकरी.

मोदी सरकारच्या नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. वर्षभर याचा परिणाम भोगत आहोत. ज्यासाठी हे केले ते काम झालेच नाही, उलट आम्हाला फटकाच बसला.
-प्रमोद चव्हाण, व्यापारी, देवरूख

केंद्र शासनाचा नोटाबंदीचा निर्णय स्वागतार्ह असून दूरगामी परिणाम करणारा आहे. मात्र त्याची टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी झाली असती तर अधिक फायदेशीर ठरली असती.    
- सुधीर विचारे, राजापूर  

नोटाबंदीचा निर्णय चांगला आहे. मात्र ज्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे तो साध्य झाला आहे का, याचा खुलासा व्हावा. देशातील काळा पैसा बाहेर आला का? किती आला? याचा खुलासा होणे गरजेचे आहे. 
-प्रभाकर बंडबे, प्रिंदावण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com