ओणनवसेत शाळेला वादळाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

दाभोळ - ओणनवसे (ता. दापोली) गावातील सरस्वती माध्यमिक विद्यालयाला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. इमारतीचे सर्व पत्रे उडाले असून सुमारे तीन लाख ५३ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दाभोळ - ओणनवसे (ता. दापोली) गावातील सरस्वती माध्यमिक विद्यालयाला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. इमारतीचे सर्व पत्रे उडाले असून सुमारे तीन लाख ५३ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तालुक्‍याला सतत दोन दिवस कडकडाटासह पावसाने झोडपले. आज सकाळी वादळी वाऱ्याने ओणनवसे येथील श्री सातमाई देवी विद्या प्रसारक संस्था संचालित सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीवरील पत्रे चक्रीवादळाने उडाले. इमारतीचे नवीन बांधकाम जवळजवळ पूर्णत्वास गेले होते. विद्यालयात आठवी ते दहावीचे वर्ग भरविण्यात येतात. यात १३२ पटसंख्या आहे.

नवीन बांधलेल्या चार वर्गखोल्यांसमोरील पत्र्याच्या शेडचेही नुकसान झाले. ओणनवसे तलाठी अमित शिगवण यांनी पंचनामा केला. वर्गखोल्यांचे बांधकाम व पत्र्यांचे शेड लोकवर्गणीतून करण्यात येत होते. या घटनेची माहिती मिळताच संस्थाध्यक्ष अनंत करबेले, उपाध्यक्ष मिलिंद दांडेकर, शालेय समितीचे अध्यक्ष मुकुंद दांडेकर, संचालक सुरेंद्र कर्लेकर, मुख्याध्यापक अनिल देसाई, पोलिसपाटील अशोक खोत यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

सरकारच्या मदतीची अपेक्षा
श्री सातमाई देवी विद्या प्रसारक संस्था ओणनवसे संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालयाची जुनी इमारत मोडकळीस आल्याने नवीन इमारत व शेडचे बांधकाम मेमध्ये पूर्ण केले. लोकवर्गणीतून कामे झाली. इमारतीच्या उद्‌घाटनापूर्वीच चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता इमारतीसाठी सरकारस्तरावर जास्तीत जास्त मदत मिळेल, अशी अपेक्षा अनंत करबेले यांनी व्यक्त केली.

Web Title: Ratnagiri News Onanvase school damage due to heavy rains