मोटार बेकरीत घुसल्याने झालेल्या अपघातात चाकरमानी ठार

प्रकाश भेकरे
बुधवार, 7 मार्च 2018

लोटे - चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्याने गाडीने वडापावची टपरी तोडली. भरधाव वेगात असल्याने गाडी बेकरीमध्ये घुसली. या अपघातामध्ये टपरीमध्ये बसलेला चाकरमानी मुकेश विठ्ठल कासेकर हा जागीच ठार झाला.

लोटे - चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्याने गाडीने वडापावची टपरी तोडली. भरधाव वेगात असल्याने गाडी बेकरीमध्ये घुसली. या अपघातामध्ये टपरीमध्ये बसलेला चाकरमानी मुकेश विठ्ठल कासेकर हा जागीच ठार झाला.

या अपघातामध्ये वडापावची टपरी व शेजारी उभी केलेल्या दुचाकीचा चक्‍काचूर झाला आहे.  बेकरीसह अपघातग्रस्त गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात मुंबई- गोवा महामार्गावर लोटे येथील घाणेखुंट फाटा येथे मंगळवारी (ता. 6) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झाला. 

चालक राजेंद्र सखाराम कदम (वय 27, रा. हुंबरी, ता. खेड) हा मोटार (एमएच-08-एसी-1667) घेऊन केळणे ते हुंबरी असा प्रवास करत होता. बोलेरो गाडीतील सर्व प्रवासी केळणे (ता. खेड) येथे साखरपुड्याला गेले होते. साखरपुडा झाल्यानंतर परत हुंबरीकडे जाण्यासाठी निघाले होते. मोटार पटवर्धन लोटे येथे आली असता चालकाचा ताबा सुटल्याने सुरेश चंद्रकांत गवळी यांच्या वडापावच्या टपरीमध्ये घुसली. त्यानंतर शेजारीच असणाऱ्या गायत्री स्वीट मार्ट या बेकरीमध्ये जाऊन उलटली. यावेळी टपरीमध्ये गाडीची वाट पाहत बसलेला मुकेश विठ्ठल कासेकर (वय 24, रा. कोतवली, समोरची भोईवाडी, सध्या मुंबई ) याला गाडीने उडवल्याने तो रस्त्यावर फेकला गेला. यात तो जागीच ठार झाला.

मुकेश विठ्ठल कासेकर हा कामानिमित्त मुंबईमध्ये वास्तव्यास होता. तो कोतवली येथील घरी पालखी येणार म्हणून आला होता. पालखी घरी येऊन गेल्यानंतर मुंबई येथे जाण्यासाठी वडापावच्या टपरीमध्ये येणाऱ्या गाडीची वाट पाहत बसला होता. या अपघातामध्ये गायत्री बेकरीच्या बाहेर उभी केलेल्या निसार अब्दुल्ला आरकाटे यांच्या दुचाकीचे  (एमएच-08-एडी-4075) मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद लोटे पोलीस ठाण्यात झाली आहे. 

दरम्यान, अपघातानंतर फरार झालेल्या चालकाला खेडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातामध्ये मोटारीत बसलेले नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. भागोजी विठ्ठल माने (वय 55), पांडुरंग बाबू शिंदे (60), काशिनाथ बाबू शिंदे (35), रेश्‍मा काशिनाथ शिंदे (30), सुरेखा रामचंद्र डोईफोडे (21), कोमल गणेश कोकरे (23), प्रशांत बबन कोकरे (30), यशवंत बाबाजी कोकरे (35), तेजल राजाराम शिंदे (20, सर्व रा. हुंबरी, खेड) अशी त्यांची नावे आहेत.

 

Web Title: Ratnagiri News one dead in an accident in GhaneKhunt Phata