एक लाख ११ हजार १११ सूर्यनमस्काराने आदित्ययाग

मकरंद पटवर्धन
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

रत्नागिरी - कशेळी (ता. राजापूर) येथील श्री कनकादित्य मंदिरात रथसप्तमीला सलग २४ तास १ लाख ११ हजार १११ सूर्यनमस्काराचा आदित्य याग आयोजित केला आहे. सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्तापर्यंत समंत्र सूर्यनमस्कार घालण्यात येणार आहेत.

रत्नागिरी - कशेळी (ता. राजापूर) येथील श्री कनकादित्य मंदिरात रथसप्तमीला सलग २४ तास १ लाख ११ हजार १११ सूर्यनमस्काराचा आदित्य याग आयोजित केला आहे. सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्तापर्यंत समंत्र सूर्यनमस्कार घालण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर असा उपक्रम झालेला नाही. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती पुण्यातील चैतन्य योग साधनेचे प्रमुख श्री. वि. साठ्ये यांनी दिली.

श्री. साठ्ये यांनी  येथे सांगितले की, कशेळी येथील कनकादित्य मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाच्या मदतीने यंदा प्रथमच पुण्याबाहेर हा उपक्रम होणार आहे. १३ व १४ जानेवारी २०१८ ला कार्यक्रम होतील. २००९ च्या रथसप्तमीला २०० व्यक्तींनी सहभाग घेऊन १६ हजार सूर्यनमस्कार घातले. त्यानंतर प्रतिवर्षी त्यात वाढ होत गेली. गतवर्षी ११६५ जणांनी १ लाख ९ हजार ४० सूर्यनमस्कार घातले. यंदा सातव्या वर्षी सुमारे १५०० जण १ लाख ११ हजार १११ नमस्कार घालणार आहेत. याचे नियोजन सुरू आहे.

साठ्ये म्हणाले की, सूर्य व पृथ्वीच्या फिरण्यामुळे सर्व शास्त्रांची निर्मिती झाली. सूर्याच्या ऊर्जेमुळेच सृष्टीचे भरण-पोषण होते. भारताला सूर्यप्रकाश व ऊर्जा अत्यंत संतुलित प्रमाणात मिळते. मात्र, सूर्यतेजाचा हवा तेवढा उपयोग करून घेतला जात नाही. स्वयंपाकापासून ते सागराचे क्षारयुक्त खारट पाणी गोड करून देण्यापर्यंत सूर्याची कृपा आहे. शरीर पुष्ट व निरोगी राहण्यासाठी भारतात सूर्यनमस्कार ही तेजस्वी व्यायामपद्धती शोधून काढली गेली.

सूर्यनमस्कार अनेक प्रकारे उपकारक आहेत व त्यांचा प्रसार व प्रचारासाठी चैतन्य योगसाधना उपक्रम राबवते. चैतन्य योगसाधनेतर्फे रत्नागिरीतील शाळांशी संपर्क साधण्यात येत आहे. जीजीपीएस, शिर्के प्रशाला, पटवर्धन हायस्कूल, नानल गुरुकुल व बाबुराव जोशी गुरुकुल आदीमधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

सौरसूक्त पठणही
आदित्ययागामध्ये सूर्यनमस्कार समंत्र असल्याने सौरसूक्त पठण- १०८ आहुती, नवग्रह पूजन, अखंड सूर्यनमस्कार, भजन, विविध गुणदर्शन कार्यक्रम, ७००० दिव्यांचा दीपोत्सव व सूर्यनमस्कार स्पर्धा होतील.

Web Title: Ratnagiri News one lakh 11 thousand Surynamara Adityayag