शिरगाव मत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यास विद्यार्थी संघटनांचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय नागपूरच्या महाराष्ट्र पशू, मत्स्यविज्ञान विद्यापीठाला (माफसू) संलग्न करण्याचा घाट घालत आहे. याला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने विरोध दर्शवला आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. 

रत्नागिरी - समुद्र, धरण, नदी, खाड्या अशा सर्व पातळीवर मत्स्यशेतीची सर्वाधिक संधी फक्त कोकणाला आहे. त्यामुळे कोकणातच खऱ्या अर्थाने मत्स्य विद्यापीठ स्थापन करावे, असा मुणगेकर समिताचा अहवाल आहे. परंतु शासन त्याकडे डोळेझाक करत असून शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय नागपूरच्या महाराष्ट्र पशू, मत्स्यविज्ञान विद्यापीठाला (माफसू) संलग्न करण्याचा घाट घालत आहे. याला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने विरोध दर्शवला आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. 

2000 पासून शासन स्तरावर चार-पाच वेळा मत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासंदर्भात चर्चा झाली. सध्याही असा विचार सुरू असल्याने याविरोधात वातावरण तापले आहे. हा राजकीय निर्णय आहे. 

दृष्टिक्षेपात मच्छीमारी 

 • कोकणाला 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा 
 • किनारीपट्टीचे जिल्हे 6 
 • ग्रामीण गावे 406 
 • मासेमारी बंदरे 184 
 • मच्छीमार लोकसंख्या 4.50 लाख 
 • क्रियाशील मच्छीमार 54,901 
 • मुख्य मोठी बंदरे 3 
 • मासे उतरविण्यासाठीचे धक्के 22 
 • यांत्रिकी नौका 13,053 
 • यांत्रिकी छोट्या होड्या 3,382 
 • पारंपरिक नौका 7,073 
 • बर्फ कारखाने, कोल्ड स्टोअरेज 175 पेक्षा अधिक 

1955 मध्ये केंद्र शासनाने रत्नागिरी व तारापूर येथे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र सुरू केले. 1981 मध्ये शिरगावला मत्स्य महाविद्यालयाची स्थापना झाली. 1972 मध्ये सुरू झालेल्या कोकण कृषी विद्यापीठाशी हे महाविद्यालय संलग्न आहे. आतापर्यंत येथून 1200 विद्यार्थी पदवी व 300 विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. 

या महाविद्यालयास भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीआर, नवी दिल्ली) याचे मानांकन सलग 15 वर्षे मिळत आहे. त्यामुळे आयसीआरचे मानांकन नसलेल्या मत्स्यविज्ञान विद्यापीठात हे महाविद्यालय नेल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. मानांकन रद्द होऊन पदवी दुय्यम ठरेल व अन्य राज्यातील मत्स्यशास्त्र पदवीधरांशी हे विद्यार्थी स्पर्धा करू शकणार नाहीत, असा आक्षेप मत्स्यशास्त्र पदवीधरांच्या फिशरीज ग्रॅज्युएट फोरमने घेतला आहे. 

मत्स्यशास्त्रात समाविष्ट अभ्यासक्रमाचा मुख्य भाग हा समुद्र आहे. त्यामुळे त्यातील प्रात्यक्षिक ज्ञान घेण्याकरिता व मच्छीमार, सामान्य जनतेच्या हितासाठी मत्स्यशास्त्रामध्ये विविध प्रयोग करण्याकरिता मत्स्य महाविद्यालय अतिशय सुयोग्य व परिपूर्ण आहे. परकीय चलन मिळवून देणाऱ्या मत्स्योत्पादनामुळे बहुतांश मत्स्य प्रक्रिया कारखाने कोकणात आहेत. निमखाऱ्या कोळंबीची शेती कोकणातच आहे. हे नैसर्गिक स्रोत व उद्योग नागपुरात नाहीत. त्यामुळे हे महाविद्यालय तिथे संलग्न करू नये, अशी मागणी आहे. 

तीन मत्स्य महाविद्यालये 
नागपूर, उद्‌गीर व शिरगाव-रत्नागिरी येथे राज्यातील तीन मत्स्य महाविद्यालये आहेत. ही सर्व एकत्र करून एका स्वतंत्र मत्स्य विद्यापीठाची स्थापना करणे गरजेचे आहे. मुणगेकर समितीने राज्यामध्ये स्वतंत्र मत्स्य विद्यापीठाकरीता शिफारस शासनाकडे या आधीच केली आहे. रत्नागिरीतच हे विद्यापीठ झाल्यास त्याचा फायदा होईल. 

कोकणचा आवाज विधानसभेत पाहिजे 
2007 मध्ये केरळ आणि 2010 मध्ये तमिळनाडूमध्ये मत्स्य विद्यापीठ सुरू झाले. त्याच धर्तीवर रत्नागिरीतही मत्स्य विद्यापीठ स्थापन व्हावे, अशी आग्रही मागणी आहे. मात्र याकरिता लोकप्रतिनिधींना कोकणचा आवाज विधानसभेत उठवला पाहिजे. 

Web Title: Ratnagiri News oppose to attach Shirgaon Fishery college to MAFASU